राज्यातील पहिल्या रेल्वे कारखान्यातून हजारो रोजगार निर्मितीची प्रतीक्षा कायम

मुंबई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून डिसेंबर २०२०मध्ये लातूरस्थित मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये एक कोचशेल बांधण्यात आला. मात्र त्यानंतर अद्याप या कारखान्यात डब्याचे उत्पादन सुरू झालेले नाही.

मध्य रेल्वेच्या अखत्यारीत असलेल्या लातूरमध्ये रेल्वे विकास निगम लिमिटेडने (आरव्हीएनएल) या कारखान्याची उभारणी केली. मात्र रेल्वे मंडळाने उत्पादन सुरू करण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. कारखान्याचे काम पूर्ण झाले असले तरी रेल्वे मंडळाला मुहूर्त मिळत नसल्याने देशातील चौथ्या आणि राज्यातील पहिल्या रेल्वे कारखान्यातून हजारो रोजगार निर्मितीची प्रतीक्षा कायम आहे.

या रेल्वे कारखान्यात रेल्वे मंडळ, मध्य रेल्वे आणि आरव्हीएनएल या यंत्रणांचा सहभाग आहे. उभारण्याची जबाबदारी आरव्हीएनएलकडे आहे. कारखाना सुरू झाल्यानंतर याची देखभाल मध्य रेल्वेकडून होणार आहे. रेल्वे कारखान्यातून उत्पादन केव्हा सुरू करायचे, याबाबत निर्णय रेल्वे मंडळाकडून घेण्यात येणार आहे.

रेल्वे कारखाना मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. हस्तांतरणासंबंधी काही कागदपत्रांवर स्वाक्षरी झाल्यावर ही प्रक्रिया पूर्ण होईल. दरम्यान, रेल्वेचे उत्पादन विभाग म्हणून लातूर रेल्वे कारखाना असणार आहे. यामुळे हा उत्पादन विभाग केव्हा कार्यान्वित करण्यात येईल, याबाबत निर्णय रेल्वे मंडळाचा आहे. किती महिन्यात हा निर्णय घ्यायचा, याचे स्वातंत्र्य रेल्वे मंडळाचे आहे, असे मध्य रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

२५ डिसेंबर २०२०मध्ये मराठवाडा रेल्वे कारखान्यातून कोचशेलची बांधणी यशस्वी झाली, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली होती. असे असताना ऑगस्ट २०२२मध्येही या कारखान्यातून उत्पादन का सुरू झाले नाही, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. रेल्वे मंडळाकडे निर्णय प्रलंबित असल्याने मध्य रेल्वे आणि आरव्हीएनएलमधील कोणताही अधिकारी याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यास तयार झालेला नाही.

रेल्वे कारखान्याचा प्रवास
जानेवारी २०१८ : लातूर येथे मेट्रो कोच कारखाना स्थापन करण्याची घोषणा

फेब्रुवारी २०१८: रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार

मार्च २०१८ : रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कारखान्याचे भूमिपूजन

ऑगस्ट २०१८ : निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाचे आदेश

सप्टेंबर २०१८: रेल्वे विभागाकडून एमआयडीसीकडे जागेसाठी निधीचा भरणा

ऑक्टोबर २०१८ : कामाला प्रत्यक्षात सुरुवात

डिसेंबर २०२० : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी एका कोचशेलची बांधणी

ऑगस्ट २०२२ : उत्पादन अद्याप सुरू झालेले नाही

Leave a Comment

Home
माझा व्यवसाय
बातमी
छोट्या जाहिराती