प्रत्येक गावात आता एक महा ई सेवा केंद्र
प्रत्येक गावातील विद्यार्थी, नागरिकास गावातच सर्व दाखले मिळावेत, यादृष्टीने आता प्रत्येक गावात महा ई सेवा केंद्रे सुरू केली जाणार आहेत. सध्या सोलापूर शहर–जिल्ह्यात एक हजार ४०८ महा ई सेवा केंद्रे सुरू असून ज्या गावात केंद्रे नाहीत, अशा ३३० ठिकाणी आता महा ई सेवा केंद्रे सुरू होणार आहेत.
सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक गावातील विद्यार्थी, नागरिकास गावातच सर्व दाखले मिळावेत, यादृष्टीने आता प्रत्येक गावात महा ई सेवा केंद्रे सुरू केली जाणार आहेत. सध्या सोलापूर शहर-जिल्ह्यात एक हजार ४०८ महा ई सेवा केंद्रे सुरू असून ज्या गावात केंद्रे नाहीत, अशा ३३० ठिकाणी आता महा ई सेवा केंद्रे सुरू होणार आहेत. त्यासाठी तब्बल नऊपट म्हणजेच दोन हजार ९९८ उमेदवारांनी अर्ज केले असून त्यातून पात्र उमेदवारांच्या निवडी डिसेंबरमध्ये होणार आहेत.
शासकीय नोकरभरतीसाठी नेहमीच एका जागेसाठी १५० हून अधिक अर्ज येतात हे नेहमीच पाहायला मिळते. पण, सोलापूर जिल्ह्यात आता एका महा ई सेवा केंद्रासाठी नऊ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. आता त्यातून त्या गावातील, भागातील स्थानिक रहिवासी, किमान दहावी उत्तीर्ण, १८ वर्षे पूर्ण व आपले सरकार सेवा केंद्र चालक (सीएससी), अशा चार मुद्द्यांवर छाननी होणार आहे. चारही बाबी पूर्ण करणारे एकाच गावात एकाहून अधिक असल्यास त्यात महा ई सेवा केंद्र कोणाला द्यायचे, याचा निर्णय शिक्षण, वय व आपले सरकार सेवा केंद्राचे ट्रान्झेक्शन पाहिले जाणार आहे. दरम्यान, गावातील लोकांना जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमेलियर, रहिवासी दाखला (डोमिसाईल) याशिवाय प्रांताधिकारी व तहसीलदारांकडून मिळणारे सर्व प्रकारचे दाखले गावातच महा ई सेवा केंद्रातून काढता येतात. त्यासाठी तालुक्याला जाण्याची गरज भासत नाही.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी गावातील लोकांना दाखले काढण्यासाठी त्यांचा वेळ व पैसा जास्तीचा खर्च करायला लागू नये म्हणून प्रत्येक गावात लोकसंख्येच्या प्रमाणात महा ई सेवा केंद्र असावे अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह अन्य कोणत्याही घटकाला यंदा प्रवेशावेळी कागदपत्रांसाठी हेलपाटे मारावे लागले नाहीत. आता आणखी ३३० केंद्रे वाढल्यावर आणखी सुविधा देणे सुलभ होणार आहे.
पुढील आठवड्यात होईल कार्यवाही
जिल्ह्यातील ३३० ठिकाणी नव्याने महा ई सेवा केंद्रे सुरू केली जाणार असून त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. ते सगळे अर्ज जिल्ह्याच्या सेतू समितीपुढे छाननीसाठी ठेवले जातील. त्यानंतर पात्र अर्जदारांच्या निवडी केल्या जातील. निवडीची प्रक्रिया पुढील महिन्यात पार पडेल.
– मनीषा कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर
महा ई सेवा केंद्रांची स्थिती
सुरू असलेली केंद्रे : १,४०८
नव्याने सुरू होणारी केंद्रे : ३३०
केंद्रांसाठी आलेले अर्ज : २,९९८