कृषी विभागाने श्रमदानातून उभारले 9 वनराई बंधारे,40 लाख लिटर पाणीसाठा:40 ते 50 हेक्टर क्षेत्राला होणार फायदा

ओढे, नाले व नद्यांमधून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी कृषी विभागामार्फत चांदवड तालुक्यातील गणूर, वडनेरभैरव, न्हनावे, दिघवद, देवरगाव, मेसनखेडे खुर्द, शिवरे, काजीसांगवी या गावांमध्ये आतापर्यंत नऊ वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमुळे ४० लाख लीटर पाणीसाठा होणार असून सुमारे ४० ते ५० हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे. वनराई बंधाऱ्यांमुळे भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होऊन रब्बी हंगामास फायदा होणार आहे. तालुक्यातील देवरगाव येथे मंडळ कृषी अधिकारी प्रेमानंद राठोड व कृषी सहायक चंद्रकला पगार यांच्या पुढाकाराने श्रमदानातून वनराई बंधारा उभारण्यात आला. रब्बी हंगामात गहू, हरभरा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली असते. ऐन पक्वतेच्या अवस्थेत पिकाला एक पाण्याची पातळी कमी पडून उत्पादनात घट होते. अशावेळी वनराई बंधाऱ्यांच्या साठलेल्या पाण्याचा पिकांना फायदा होईल, अशी माहिती कृषी सहायक चंद्रकला पगार यांनी दिली. यासाठी शेतकऱ्यांनी रिकाम्या झालेल्या सिमेंटच्या गोण्यांच्या साहाय्याने ओढ्या, नाल्यांना वनराई बंधारे उभारले तर पिकांना संरक्षित पाणी देऊन उत्पादनात निश्चितच वाढ होऊ शकते. वनराई बंधाऱ्यात साठलेल्या पाण्यामुळे परिसरातील विहिरींच्याही पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. देवरगाव येथे मंडल कृषी अधिकारी प्रेमानंद राठोड, कृषी पर्यवेक्षक पी. सी. जाधव, कृषी सहायक चंद्रकला पगार आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. ^चांदवड तालुक्यातील ज्या गावांमध्ये नैसर्गिक प्रवाह वाहत आहेत, तेथे कृषी विभागामार्फत लोकसभागातून वनराई बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होऊन आगामी रब्बी हंगाम यामुळे यशस्वी होण्यास मदत होणार आहे. नीलेश मावळे, कृषी अधिकारी

Share

-