अमोल मिटकरींचे जितेंद्र आव्हाडांना आव्हान:म्हणाले – अजितदादा जिंकले तर रोज सकाळी वर्षा बंगल्यावर पाणी भरायला यायचे
बारामतीत अजित पवार एका मताने जरी जिंकले तर जितेंद्र आव्हाडांनी रोज सकाळी 6 ते 8 वाजता वर्षा बंगल्यावर झाडू मारायला यावे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी दिले आहे. जर अजित पवार बारामतीमधून पराभूत झाले, तर मी मरेपर्यंत जितेंद्र आव्हाडांचा गुलाम राहीन, असेही अमोल मिटकरी म्हणाले. आमच्या 35 ते 40 जागा निवडून येतील
अजित पवार किंग आणि किंगमेकर ठरतील असे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले होते. त्यावर बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ज्या ठिकाणी निवडणूक लढवली, तेथील उमेदवार मेरिटचे आहेत. मी देखील प्रचारासाठी फिरलो आहे. त्यामुळे एकंदरीत लक्षात येते की 35 ते 40 जागा आमच्या निवडून येतील. त्यामुळे हा आकडा सत्तास्थापनेसाठी मोठा आकडा असेल. या विश्वासावर मी पक्षाचा प्रचारक किंवा प्रवक्ता म्हणून ट्वीट केले आहे की, किंग आणि किंगमेकर सुद्धा अजित पवार असतील. अशी माझी कार्यकर्ता म्हणून भावना आहे, असे विधान अमोल मिटकरी यांनी केले आहे. अजित पवारांच्या निर्णयाशी कार्यकर्ता बांधील
उद्या दुपारपर्यंत मतदानाचे चित्र स्पष्ट होईल. आम्ही महायुतीबरोबर निवडणुका लढवलेल्या आहेत. अजित पवार जी भूमिका घेतील त्या निर्णयाला राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता बांधील आहे. उद्या एक वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रात जे चांगले सरकार स्थापन होईल, त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा सहभाग असेल. संजय शिरसाट यांनी जी भावना व्यक्त केली होती की, पक्ष हितासाठी एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो त्यांना मान्य असेल. तशीच माझीही भावना आहे. माझ्या पक्षाचे नेते अजित पवार हे पक्ष हितासाठी जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू, असेही अमोल मिटकरी म्हणाले.
हे ही वाचा… राज्यात मुख्यमंत्री पदासाठी संघर्ष:अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर; तर काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापनेचा नाना पटोलेंचा दावा विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी महाराष्ट्रात नव्या मुख्यमंत्र्यांबाबत दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांना भावी मुख्यमंत्री म्हणत बारामतीत पोस्टर लावण्यात आले आहेत. अजित पवार हे बारामतीतून विधानसभा निवडणूकही लढवत आहेत. सविस्तर वाचा… छोटे पक्षच किंगमेकर ठरणार – महादेव जानकर:पाठिंबा हवा असल्यास मंत्रिमंडळात सामील करण्याची दोन्ही आघाड्यांसमोर अट सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षांकडून संख्याबळाची जमवाजमव केली जात आहे. यंदाच्या निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्षांना महत्व राहणार आहे. अशात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी छोटे पक्षच किंगमेकर ठरणार असल्याचे म्हटले आहे. तसेच रासपचा पाठिंबा हवा असल्यास मंत्रिमंडळात सामील करावे, अशी अट देखील महायुती आणि महाविकास आघाडीसमोर ठेवली आहे. सविस्तर वाचा…