बापाने मुलाची मिमिक्री करणे अयोग्य:अजित पवारांच्या भावनांचे राजकारण होणे वेदनादायी, अमोल मिटकरींचा पवारांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांची नक्कल केल्याच्या मुद्यावरून शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांशी संबंधित प्रत्येक कार्यकर्ता त्यांना आपल्या वडिलांच्या भूमिकेत पाहतो. त्यामुळे बापाने मुलाची मिमिक्री करणे हे दुःखदायक आहे. अजित पवारांच्या भावनांचे राजकारण होणे हे फार वेदनादायी आहे, असे ते म्हणालेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मंगळवारी बारामती विधानसभा मतदारसंघातील कन्हेरी येथे एक सभा झाली. या सभेत शरद पवारांनी अजित पवारांच्या कथित रडगाण्याची नक्कल केली. त्यांच्या या नक्कलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर अजित पवारांनी या प्रकरणी त्यांच्यावर पलटवार केला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांची कृती अत्यंत वेदनादायी अमोल मिटकरी म्हणाले, शरद पवारांची कृती त्यांना मानणाऱ्या प्रत्येकासाठी वेदनादायी आहे. कारण, शरद पवारांशी संबंधित प्रत्येक कार्यकर्ता त्यांना आपल्या बापाच्या भूमिकेत पाहतो. त्यामुळे बापाने मुलाची मिमिक्री करणे हे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी दुःखदायक आहे. अजित पवारांच्या भावना खऱ्या होत्या. त्यात कोणतेही राजकारण नव्हते. त्यामुळे ते व्यक्त झाले. पण त्यांच्या भावनांचे राजकारण होणे फार वेदनादायी आहे. अजित पवारांनीही साधला होता निशाणा उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवार यांनी या प्रकरणी शरद पवार यांच्या नक्कलेचा समाचार घेतला होता. शरद पवारांनी केलेली नक्कल मी पाहिली नाही. पण ती माझ्या कानावर आली. नक्कल करणे हा त्यांचा अधिकार आहे. मी त्यावर बोलणार नाही. पण शरद पवार हे राज्य व देशाच्या राजकारणात ज्या उंचीवर आहेत, ते पाहता त्यांनी त्यांच्या मुलासारख्या असलेल्या माणसाची नक्कल करणे अनेकांना आवडले नाही. त्यांच्या जागी इतर एखाद्या व्यक्तीने असे केले असते तर चालले असते, असे ते म्हणाले होते. बारामती येथील सभेत मी भावनिक झालो, पण मी रुमाल काढला नाही. याऊलट त्यांनी रुमाल काढला. माझ्या आई-वडिलांचे नाव घेतल्यामुळे मी भावनिक झालो होतो. मी लगेच विषय बदलला. जे झाले ते पूर्णतः नैसर्गिक होते. एवढ्या दिवसापर्यंत मला वाटत होते की, केवळ राज ठाकरे हेच नक्कल करतात. पण आता दुसरेच समोर आले. हे पाहून माझ्या मनाला वेदना झाल्या, असेही अजित पवार म्हणाले होते. हे ही वाचा… शरद पवारांनी केली अजित पवारांची नक्कल:चश्मा काढला, डोळेही पुसले; बारामती मतदारसंघात युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी थोपटले दंड बारामती – बारामती विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यावेळी चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. अजित पवार विरुद्ध पुतण्या युगेंद्र पवार अशी लढत होत आहे. यात अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर आरोप केले होते. त्याला उत्तर देताना शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. इतकेच नाही तर अजित पवार यांची नक्कल करत शरद पवार यांनी डोळ्यावरील चष्मा काढला, तसेच डोळे देखील पुसले. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. वाचा सविस्तर

Share

-