चंद्रपूर हा ‘वाघ’ आणि ‘वार’ यांचा जिल्हा, दोघांचा आदर करतो:देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी; तर वडेट्टीवारांकडून त्यांना पंतप्रधान पदासाठी शुभेच्छा

राज्याचे दुसरे मुख्यमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे नेते मा. सा. कन्नमवार उर्फ दादासाहेब यांची आज 125 वी जयंती आहे. या निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात आले होते. त्यामुळे या कार्यक्रमात चांगलीच राजकीय टोलेबाजी रंगली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादासाहेब कन्नमवार यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान तसेच महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेत आणि स्थापनेनंतरच्या विकासामध्ये योगदान यावर भाष्य केले. चंद्रपूर जिल्हा हा ‘वाघ’ आणि ‘वार’ यांचा जिल्हा आहे. सुधीर मुनगंटीवार येथील आमचे नेते आहेत. तसेच प्रत्येक ‘वारा’चा आम्ही सन्मान करत असल्याचे फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे. आम्ही हेडगेवार यांचे अनुयायी आहोत, असे देखील ते म्हणाले. वास्तविक या कार्यक्रमाला विजय वडेट्टीवार यांना आमंत्रित करून त्यांना अध्यक्षपद देण्यात आले होते. त्यामुळे मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा रंगली होती. मात्र मी नाराज नाही तर मुंबईत एका खासगी कामानिमित्त असल्याने मला या कार्यक्रमाला जाता येत नसल्याचे मुनगंटीवार यांनी माध्यमंशी बोलताना सांगितले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्टिकरण दिले आहे. मुनगंटीवार यांचा मला फोन आला होता. ते कामानिमित्त मुंबईत असल्याचे आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनीच मला सांगितले आहे. अशी माहिती देखील यावेळी फडणवीस यांनी दिली. वडेट्टीवांरांच्या फडणवीसांना शुभेच्छा यावेळी बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. आपण पुढे भविष्यात मोदींच्या पावलावर पाऊल ठेवावे, अशी आमच्या सर्वांची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी मुख्यमंत्री पदावरून पंतप्रधान पदासाठी शुभेच्छा दिल्या असल्याचे बोलले जात आहे. दादासाहेबांच्या कार्याचा गौरव दादासाहेब यांना कर्मवीर ही पदवी लोकांनी दिलेली असल्याची यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात दादासाहेब यांचे काम मोठे असल्याचे देखील फडणवीस म्हणाले. मी मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा पुन्हा मुख्यमंत्री झालो. त्यामुळे दादासाहेब आणि माझ्यात ती एक समानता असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर दादासाहेबांवर संसदीय मंडळाच्या माध्यमातून गौरव पंथ प्रकाशित करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

Share

-