शेतकऱ्याच्या धावपटू मुलीला मिळाली कौतुकाची थाप:पुण्यात मिळणार प्रशिक्षण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली जबाबदारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सांत्वनसाठी भंडाऱ्याच्या सुकळी या गावी गेले होते. नाना पटोले यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन झाले होते. त्यांना भेटण्यासाठी म्हणून फडणवीस या गावी गेले होते. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा मात्र एका कुटुंबासाठी कलाटणी देणारा ठरला आहे. भंडारा जिल्ह्यातील सुकळी या गावाच्या शेजारीच सेंदूरवाफा नावाचे एक छोटे गाव आहे. येथील पल्लवी सेवकराम डोंगरवार ही येथील राजीव गांधी महाविद्यालयात शिकणारी 19 वर्षीय धावपटू आहे. 5 ते 8 जानेवारी दरम्यान झारखंडच्या रांची येथे पार पडलेल्या 68 व्या राष्ट्रीय शालेय मैदान क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करत मैदान गाजवले होते. 4 X 400 रिले धावण्याच्या शर्यतीत पल्लवीने ब्रॉन्झ पदक महाराष्ट्राला मिळवून दिले होते. या तरुणीची माहिती नाना पटोले यांनी स्वतः फडणवीस यांना दिली होती आणि तिथून मुख्यमंत्र्यांनी थेट या गावात जाऊन पल्लवीची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पल्लवीला बोलावून तिची विचारपूस करत पाठीवरून कौतुकाची थाप दिली. महाराष्ट्रासाठी पदक जिंकले असल्याने आणखी चांगले प्रशिक्षण मिळाल्यास महाराष्ट्रासाठी चांगली कामगिरी पल्लवी करू शकते याची जाणीव देवेंद्र फडणवीस यांना झाली आणि त्यांनी लगेच पल्लवीचे पालकत्व महाराष्ट्र स्वीकारेल अशी घोषणा केली. पल्लवीला चांगले प्रशिक्षण मिळावे यासाठी पुण्यातील बालेवाडी येथील प्रशिक्षण संस्थेत पाठवण्याचे आणि पूर्ण प्रशिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्र शासन उचलेल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. फडणवीस यांनी आश्वासन दिल्यानंतर पल्लवीसह तिच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर एकच आनंद दिसून आला. ग्रामीण भागातून अनेक खेळाडू निर्माण होतात. मात्र आर्थिक पाठबळ नसल्याने अनेकवेळा ते पुढे येऊ शकत नाहीत. त्यांना योग्य प्रशिक्षण आणि आर्थिक पाठबळ मिळाले तर ही मुलं महाराष्ट्राचे नाव देशाच्याच नव्हे तर जगाच्या पाठीवर कोरतील. अनेकदा आर्थिक पाठबळ तसेच योग्य प्रशिक्षण न मिळाल्याने ग्रामीण भागातील मुलं खचून जातात, त्यांना गरज असते प्रशिक्षणाची आणि स्पर्धेच्या दृष्टीने तयार होण्याची, तेवढे मिळाले तर ग्रामीण भागातील मुलं काय असतात हे पूर्ण देश बघेल.

Share

-