एकत्र लढण्यासाठी काँग्रेसचा पुढाकार:ठाकरेंची चर्चा करण्याची वडेट्टीवारांची तयारी; नसता शरद पवारांच्या पक्षासोबत लढणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मात्र, तरी देखील आम्ही उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन त्यांना एकत्र येण्याची विनंती करणार असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर दिल्लीत ‘I.N.D.I.A.’ आघाडी अजूनही मजबूत असल्याचा दावा देखील वडेट्टीवार यांनी केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकिकडे स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याची घोषणा करत, इंडिया आघाडी तुटण्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे इंडिया आघाडी मजबूत असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यामुळे आता या सर्व घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या संदर्भात विजय वडेट्टीवार म्हणाले की, इंडिया आघाडी अजूनही मजबूत आहे. दिल्लीमध्ये इंडिया आघाडी एकत्रीत काम करत आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढलो होतो. तसेच आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील एकत्रीत लढवण्याचा आमचा प्रयत्न असेल. संजय राऊत हे त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यांनी स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा केली असली तरी आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांना एकत्र लढवण्याची आम्ही विनंती करणार असल्याची माहिती देखील वडेट्टीवार यांनी केली आहे. तर काँग्रेस – शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत लढणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा आमचा प्रयत्न असेल. ते सोबत आले नाही तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. ठाकरेंना विनंती करु, ते सोबत आले तर ठिक नसता आमचा मार्ग मोकळा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचा काँग्रेस पक्ष यांची नैसर्गिक आघाडी कायमस्वरूपी राहिली आहे. जर उद्धव ठाकरे यांनी ऐकलेच नाही तर आम्ही दोघे मिळून या निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करू, असे देखील ते म्हणाले. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर फोडत विजय वडेट्टीवार यांनी नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यावर चर्चेला उशीर लावल्याचा आरोप केला होता. मात्र, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचा दावा आज वडेट्टीवार यांनी केला आहे. नाना पटोले आणि संजय राऊत हे चर्चेत होते. मी देखील या चर्चेत होतो. मात्र, यात चर्चेचे गुऱ्हाळ लांबत गेल्याने आम्हाला प्रचाराला कमी वेळ मिळाल्याचे मी म्हणालो होतो. मात्र, त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचेही वडेट्टीवार यांनी केला आहे.

Share

-