शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांचा गौप्यस्फोट:बाळासाहेबांच्या निधनावर राष्ट्रीय दुखवट्याचा प्रस्ताव काँग्रेस नेत्यांनी नाकारला होता

काँग्रेसचे विरोध पक्षनेते राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. निवडणुकीच्या तोडांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आव्हान स्वीकारत गांधी यांनी हे केलं असावं असे बोलले जात आहे. राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांची स्तुती करुन दाखवावी, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी दिले होते. त्यावर आज बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी राहुल गांधी यांनी एक्सवरुन त्यांना आदरांजली वाहिली. यावर शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी गांधी यांच्या या कृतीचे स्वागत केले. ते म्हणाले की १२ वर्षांपूर्वी मुंबईचा केंद्रीय मंत्री या नात्याने त्यांनी बाळासाहेबांच्या निधनावर राष्ट्रीय दुखवटा घोषीत करावा, असा प्रस्ताव केंद्रातील तत्कालीन यूपीए सरकारकडे मांडला होता. या प्रस्तावाचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी समर्थन केले होते. मात्र यूपीएमधील काही घटक पक्षांनी आणि काँग्रेसमधील वरिष्ठांनी हा प्रस्ताव धुडाकावून लावला. त्यामुळे बाळासाहेबांचा योग्य तो राष्ट्रीय सन्मान राखला गेला नाही, असा गौप्यस्फोट खासदार देवरा यांनी केला. याबाबत खासदार देवरा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण ते प्रचारात व्यस्त असल्याने संपर्क होऊ शकला नाही. ​​बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर देवरा यांनी महाराष्ट्रातील आणि मुंबईच्या भावना केंद्र सरकारला कळवल्या होत्या. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर डॉ. मनमोहन सिंग यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करुन संवेदना व्यक्त केली होती. मिलिंद देवरा यांचा प्रस्ताव असा होता की बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा केंद्र सरकारने जाहीर करुन बाळासाहेबांच्या स्मृतीस आणि महाराष्ट्राच्या भावनेचा आदर करावा. पण दिल्लीतील काही काँग्रेसच्या नेत्यांनी हा प्रस्ताव फेटाळला असावा, असा संशय आहे. ​ ​​बाळासाहेबांना भेटणाऱ्या नेत्यांवर काँग्रेस अध्यक्षांची नाराजी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनापूर्वी जुलै २०१२ मध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली होती. त्यावेळी यूपीएचे अधिकृत उमेदवार प्रणव मुखर्जी यांनी मातोश्रीवर जाऊन बाळसाहेबांची भेट घेतली होती. मात्र ही भेट काँग्रेस अध्यक्षांना रुचली नाही, असा उल्लेख प्रणव मुखर्जी यांनी एका पुस्तकात केला होता.

Share

-