दलित मतदारांची महाविकास आघाडीकडे पाठ:’एससी’ राखीवच्या 20 सीटवर महायुतीकडे; भाजपने 10 जागा पटकावल्या!

विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या ‘एससी’साठी राखीव असलेल्या 29 मतदारसंघात मतदारांनी महाविकास आघाडीकडे पाठ फिरवत भाजपला मते दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महायुतीच्या पारड्यात 20 जागा पडल्या. भाजपने 10, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 5, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जिंकल्या. ‘एससी’साठी राखीव मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने 9 जागा जिंकल्या. त्यात काँग्रेसला 4, ठाकरेंच्या शिवसेनेला 2, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 2 आणि 1 जागा जनसुराज्य पक्षाने पटकावली. लोकसभेत आघाडीला आघाडी लोकसभा निवडणुकीत संविधान धोक्यात आल्याचा प्रचार राहुल गांधींनी केला. त्यामुळे विधानसभेच्या 29 पैकी 21 मतदारसंघात महाविकास आघाडीने मताधिक्क्यात आघाडी घेतली. राज्यातल्या पाचीच्या पाची राखीव जागी महाविकास आघाडीने बाजी मारली. विधानसभा निवडणुकीतही संविधान आणि अदानी या दोन मुद्यांभोवती महाविकास आघाडीचा प्रचार फिरत राहिलेला दिसला. मात्र, विधानसभेत राखीव मतदारसंघातले मताधिक्क्य महाविकास आघाडीला टिकवता आले नाही. ‘अनुसचित’बहुल जागीही विजयी भाजपने अनुसचित समाजाची लोकसंख्या जास्त असलेल्या मतदारसंघातही आघाडी घेतल्याचे दिसते. राज्यात असे 67 मतदारसंघ आहेत. तिथे अनुसूचित समाजाची जवळपास 15 टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. या मतदारसंघात भाजपने 42 जागा पटकावल्या. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 8, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 6 जागांवर बाजी मारली. तर या ठिकाणी महाविकास आघाडीला केवळ 8 जागांवर समाधान मानावे लागले. ‘वंचित’कडे मतदारांची पाठ वारंवार भूमिका बदलणाऱ्या वंचित बहुजन विकास आघाडीकडे विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पाठ फिरवल्याचे दिसले. यंदा प्रकाश आंबेडकरांनी तब्बल 200 जागा लढवल्या. मात्र, एकही उमेदवार विजयी झाला नाही. त्यांना 14 लाख मते पडली. विशेष म्हणजे 2019 च्या तुलनेत वंचितचे मताधिक्क्य तब्बल 11 लाखांनी कमी झाल्याचे दिसले. तेव्हा त्यांना 25 लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांना 15 लाख मते मिळाली. मात्र, त्यातही घसरण झाल्याचे दिसले. दुसरीकडे रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे हे दोघेही या निवडणुकीत महायुतीच्या बाजूने होते. मात्र, जागावाटपात त्यांच्या पक्षालाही एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे त्यांचे उमेदवार या निवडणुकीत नव्हतेच. काँग्रेसला सडेतोड उत्तर लोकसभा निवडणुकीत भाजपकडून संविधानावर घाला घालण्यात येत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. हातात संविधानाची प्रत घेऊन प्रचार केला. असाच प्रचार महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत केला. मात्र, भाजपने हे फेक नॅरेटिव्ह असल्याचा प्रचार केला. त्याला यश आल्याचे दिसले. राहुल गांधींनी राज्यात फक्त 4 प्रचारसभा घेतल्या. तर नरेंद्र मोदींनी प्रचारफेरीसह 11 प्रचारसभा घेतल्या. अमित शहांनीही महाराष्ट्रात प्रचार केला. त्याचा परिणाम झाल्याचे दिसले. दलित मतदारांना जवळ केले लोकसभेत जागा घटल्याने भाजपने विधानसभेसाठी ताकही फुंकून पिले. दलित मतदारांना आपलेसे केले. त्यांच्यासाठी खास संपर्क अभियान राबवले. या मतदारसंघामध्ये जवळपास तीन हजारांवर बैठका घेतल्या. त्यातही हिंदू दलितांना जवळ केले. संविधान बदलाचा मुद्दा खोटा आहे, हे त्यांना पटवून दिले. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. दलित महिला मतदारांवर या योजनेने जादू केली. याचा लाभही यावेळी झाला. मुस्लीमबहुल मतदारसंघातही जादू मुस्लीमबहुल मतदारसंघातही महायुतीने 21 जागा जिंकल्या. त्यात भाजपचा उमेदवार 14 जागांवर विजयी झाला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 5, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा जिंकता आल्या. मुस्लीमबहुल मतदारसंघात महाविकास आघाडीने 14 जागा जिंकल्यात. त्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 6, काँग्रेसने 5, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 3 जागा जिंकल्यात. उर्वरित 2 ठिकाणी समाजवादी पक्ष, तर मु्स्लीमबहुल मतदारसंघातली 1 जागा ‘एमआयएम’ने जिंकली आहे.

Share

-