निकालानंतर व्हीव्हीपॅटची मते मोजण्याची मागणी
विधानसभेचा निकाल जाहीर होऊन आज आठवडा झाला तरीही ईव्हीएमकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि माजी आमदार यशवंत माने यांनी व्हीव्हीपॅटमधील मते मोजण्याची मागणी केली.
मतमोजणी सुरू असताना हा अर्ज आला असता तर त्याची दखल घेतली असती. निकाल जाहीर झाल्यानंतर ही मागणी आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही नेत्यांची मागणी फेटाळली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिद्धाराम म्हेत्रे यांनी अक्कलकोटमधून काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती.
या निवडणुकीत म्हेत्रे यांना ९८ हजार ५३३ मते मिळाली तर त्यांचे स्पर्धक भाजपचे सचिन कल्याणशेट्टी यांना १ लाख ४८ हजार १०५ मते मिळाली.
येथून भाजपचे सचिन कल्याणशेट्टी विजयी झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत बनसोडे यांनी केली. या प्रक्रियेबद्दल म्हेत्रे यांनी संशय व्यक्त करत व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी करावी, अशी मागणी दोन दिवसांपूर्वी केली होती. त्यांची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली आहे.
दुसरी मागणी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यशवंत माने यांनी केली होती. त्यांनीही निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर तीन दिवसांनी ही मागणी केली आहे.
येथील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांना १ लाख २५ हजार ८३८ मते मिळाली होती. तर यशवंत माने यांना ९५ हजार ६३६ मते मिळाली होती. येथील निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी खरे यांना विजयी घोषित केल्यानंतर माजी आमदार माने यांची मागणी आल्याने ही देखील मागणी फेटाळण्यात आली आहे.
व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी करण्याबाबत सिद्धाराम म्हेत्रे यांचा अर्ज अक्कलकोटच्या तहसीलदारांकडे आला होता. हा अर्ज विहित वेळेत न आल्याने त्यांचा अर्ज ग्राह्य धरला जाऊ शकत नाही. याबाबत त्यांना कळविण्यात आले आहे. – सुशांत बनसोडे, निवडणूक निर्णय अधिकारी, अक्कलकोट