एकनाथ खडसेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट?:पुन्हा एकदा भाजप प्रवेशाची चर्चा; फडणवीस काही तोडगा काढणार का?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या आधी देखील त्यांचा दिल्लीत वरीष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश झाला असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले होते. मात्र राज्यातील नेतृत्वाकडून त्या वृत्ताला दुजोरा मिळाला नव्हता. त्यानंतर खडसे यांनी आपण शरद पवार यांच्याच पक्षात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा एका वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता खडसे यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आपला भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला असल्याचे त्यांनी स्वतः जाहीर केले होते. मात्र राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला नव्हता. त्यामुळे अखेर एकनाथ खडसे यांनी आपण शरद पवार यांच्या सोबतच असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा या आधी देखील अनेकदा समोर आल्या होत्या. मात्र, भारतीय जनता पक्षातील स्थानिक नेते त्यांना पक्षात घेण्यास फारसे इच्छुक नाहीत. त्यामुळे याबाबत आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. फडणवीस या संदर्भात काही तोडगा काढतात का? एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात फारसे सख्य नाही. हे दोन्ही नेते कायमच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आले आहेत. भारतीय जनता पक्षात सध्या गिरीश महाजन यांचे वलय दिसून येते. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांचे विरोधक म्हणून ओळख असलेले एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात काही तोडगा काढतात का? हे पाहावे लागणार आहे. एकनाथ खडसे यांच्या संदर्भात भाजप काय निर्णय घेतो? एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या भेटीमध्ये नेमकी दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली? याबाबत मात्र अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र एकनाथ खडसे यांच्या भाजपवर प्रवेशाची चर्चा या वृत्तामुळे पुन्हा एकदा सुरू झाली आहे. एकनाथ खडसे यांची सून केंद्रीय मंत्री आहेत. तर मुलगी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रमुख पदाधिकारी आहेत. त्यामुळे आता एकनाथ खडसे यांच्या संदर्भात भाजप काय निर्णय घेतो? हे पहावे लागेल.

Share

-