एकनाथ शिंदे यांचा कोल्हापुरात काँग्रेसला झटका:विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश, काँग्रेसने कापले होते तिकीट
कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जयश्री जाधव यांचा हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर महिला आघाडीच्या उपनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान काँग्रेसने राजेश लाटकरांना दिलेली उमेदवारी रद्द केल्याने त्यांनी या मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार जयश्री जाधव या देखील निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होत्या. मला तिकीट मिळेल असा दावाही त्यांनी केला होता.मात्र, काँग्रेसने मधुरिमाराजे यांना उमेदवारी दिल्याने नाराज जाधवांनी शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. तसेच नवीन उमेदवार निवडतानाही त्यांना विश्वासात घेण्यात आले नव्हते, असा आरोप आता त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. जाधव यांच्या या प्रवेशाने सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. जयश्री जाधव कोण आहेत ? जयश्री जाधव या भाजपच्या नगरसेविका होत्या. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पती उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवून शिवसेनचे राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला. जाधव यांच्या निधनानंतर 2022 मध्ये जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि त्यांनी भाजपचे सत्यजित कदम यांचा पराभर केला आणि त्या आमदार बनल्या. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही आमदार जयश्री पाटील कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढवण्यास सज्ज होत्या. पण पक्षाने आधी राजू लाटकर आणि नंतर मधुरीमाराजे यांनी उमेदवारी दिल्याने आमदार जाधव नाराज झाल्या होता. आज अखेर आपली नाराजी व्यक्त करत जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला.