विजयानंतरही भारतीय संघाची चिंता वाढली, जिंकता-जिंकता या दोन खेळाडूंमुळे बसला मोठा धक्का

 

दुबई : भारताने हाँगकाँगवर दमदार विजय मिळवला खरा, पण त्यानंतरही भारतीय संघाची चिंता वाढलेली आहे. भारतीय संघ जिंकत असताना अशा दोन गोष्टी घडल्या की ज्यामुळे भारतीय संघाला मोठे धक्के बसले असून त्यांची चिंता आता चांगलीच वाढलेली असेल.

भारतीय संघाने सूर्या आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांच्या जोरावर १९२ धावांचा डोंगर रचला. तिथेच भारतीय संघ दणदणीत विजय मिळवेल, असे वाटत होते. पण तसे घडले मात्र नाही. त्यामुळेच भारताची चिंता या सामन्यानंतर वाढली आहे. भारताने या सामन्यात सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली. पण अखेरच्या षटकांमध्ये जी गोलंदाजी पाहायला मिळाली, त्यामुळे नक्कीच रोहित शर्माचे धाबे दणाणले असतील. हाँगकाँगचा संघ हा त्यावेळी जिंकूच शकत नाही, असे वाटत होते. कारण त्यांना विजयासाठी १२ चेंडूंमध्ये ७४ धावा हव्या होत्या आणि त्या अशक्यप्राय अशाच होत्या. पण त्यानंतर १९ आणि २० या दोन षटकांमध्ये जे घडले त्यामुळे भारतीय संघाची चिंता वाढली.

भारतासाठी १९वे षटक हे वेगवान गोलंदाज अवेश खान टाकत होता. या षटकात हाँगकाँगच्या फलंदाजांनी दोन षटकार आणि दोन चौकार लगावत तब्बल २१ धावांची लूट केली. त्यानंतर २०व्या षटकात अर्शदीप सिंग गोलंदाजीला आला. या षटकात हाँगकाँगच्या गोलंदाजांनी १२ धावांची लूट केली आणि त्यामुळे त्यांचे दीड शतकही पूर्ण होऊ शकले. पण जर अशीच गोलंदाजी या युवा गोलंदाजांकडून घडली तर तो चिंतेचा विषय ठरू शकतो. कारण या सामन्यात अवेश खानने आपल्या चार षटकांमध्ये तब्बल ५३ धावा दिल्या, तर अर्शदीपने चार षटकांमध्ये ४४ धावा दिल्या. हे दोघेही या सामन्यात चांगलेच महागडे पडले. अवेशने यावेळी एका षटकात जेवढ्या धावा दिल्या तेवढ्या तर रवींद्र जडेजा आणि युजवेंद्र चहल यांनी चार षटकांमध्येही दिल्या नाहीत. रवींद्र जडेजा आणि युजवेंद्र चहल यांनी अचूक आणि भेदक मारा केला. जडेजाने तर यावेळी चार षटकांमध्ये फक्त १५ धावा दिल्या आणि एक विकेटही मिळवला. चहलने यावेळी विकेट मिळवला नसला तरी चार षटकांमध्ये फक्त १६ धावा दिल्या. त्यामुळे अवेश खान आणि अर्शदीप सिंग यांची गोलंदाजी हा चिंतेचा विषय ठरला आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी या गोष्टीकडे वेळीच लक्ष द्यायला हवे.

 

Leave a Comment

Your email address will not be published.