घाटनांद्रा घाटात बिबट्याच्या मुक्कामाने भीती:घाटातून सावधगिरीनेच प्रवास करण्याचे वन विभागाचे आवाहन, दुचाकी रात्री नकोच
घाटनांद्रा-पाचोरा रस्त्यावरील असलेल्या घाटामध्ये बिबट्या दिसल्याच्या चर्चा आता खऱ्या ठरू लागल्या आहेत. परिसरातील अनेक वाहनधारकांना घाटात बिबट्या दिसून आल्याने भीतीचे वातावरण असून याविषयी वन विभागाला विचारले असता परिसरात घनदाट जंगल असून वाहनधारकांनी रात्रीच्या वेळी दुचाकीवर घाटातून प्रवास करू नये, असे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा घाटनांद्रा घाटात मुक्काम असून अनेक प्रवाशांना व वाहनधारकांना सायंकाळच्या वेळेस या बिबट्याचे दर्शन झाले आहे. बुधवार रोजी सायंकाळी साधारण सात-आठ वाजेच्या दरम्यान घाटनांद्रा येथून खान्देश मध्ये चाललेल्या एका दुचाकीस्वारांना घाटात असलेल्या काळा कडका या परिसरातील असलेल्या संरक्षण भिंतीवर बिबट्या बसलेला असल्याचे दिसले. गाडीच्या लाइटचे फोकस बिबट्याच्या डोळ्यावर पडल्याने प्रकाशामुळे बिबट्या खाली दरीत पळून गेला. या घाटामध्ये बऱ्याच दिवसांपासून बिबट्याचा मुक्काम असून अधून-मधून होत असलेल्या बिबट्याच्या दर्शनामुळे वाहनधारकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. घाटनांद्रा-पाचोरा या खान्देशमध्ये जाण्यासाठी लागणारा घाट हा घनदाट जंगल व उंच-उंच डोंगरदऱ्यांनी वेढलेला असल्यामुळे या घाटात हिंस्र पशू-प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा या परिसरात वावर वाढला असून तो या घाटात फिरत असल्याचे अनेकांनी सांगितले आहे. मात्र, आतापर्यंत कोणावरही या बिबट्याने हल्ला केला नाही हे विशेष आहे,