सोलापूरकरांसाठी खुशखबर, लवकरच तिरुपती आणि अयोध्येसाठी विमानसेवा होईल सुरु

सोलापूरमधून श्री बालाजी दर्शनासाठी भाविकांची संख्या जास्त आहे. म्हणून सोलापूकरांमध्ये गोव्यापेक्षा मुंबई, तिरुपती व अयोध्या या मार्गावरील विमानसेवेची जास्त गरज व्यक्त केली जात आहे.
फ्लाय ९१ या गोवास्थित कंपनीची २३ डिसेंबरपासून गोवा-सोलापूर व सोलापूर- मुंबई अशी विमानसेवा सुरू होणार आहे. मुंबई इतकी सोलापूरकरांना तिरुपती मार्गावर विमानाची गरज आहे. गोवा पर्यटनापेक्षा तिरुपतीची क्रेझ सोलापूरमध्ये जास्त आहे. मात्र, तिरुपती व अयोध्या या मार्गावर विमानसेवा सुरू होण्यासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूरकरांना नागरी विमानसेवेचा लाभ घेता येणार आहे. आचारसंहितेचा अडसर नको म्हणून निवडणूक जाहीर होण्यापूर्वी २६ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर विमानतळाचे ऑनलाइन उद्‌घाटन करण्यात आले.

प्रत्यक्ष विमानसेवा मात्र २३ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. २३ डिसेंबर रोजी सकाळी ९.१० मिनिटांनी सोलापूरला पाहिले नागरी सेवा देणारे विमान गोवा येथून येणार असून त्यांनतर ते सकाळी ११.५५ वाजता मुंबईकडे उड्डाण करणार आहे. सोलापूकरांमध्ये गोव्यापेक्षा मुंबई, तिरुपती व अयोध्या या मार्गावरील विमानसेवेची जास्त गरज व्यक्त केली जात आहे.

 

सोलापूरचे धार्मिक पर्यटन वाढणार

सोलापूरहून गोव्याला जाणारांची संख्या कमी असली तरी गोव्याहून सोलापूरला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गोव्यासह कोकणात स्वामी समर्थभक्तांची संख्या जास्त आहे. विमानसेवेमुळे सोलापूरचे धार्मिक पर्यटन वाढू शकते.

मात्र, त्यासाठी येथील हॉटेलचालक, रिक्षा, टॅक्सी चालकांनी आदारातिथ्याचे धडे घेणे आवश्यक आहे. सोलापूरची यापूर्वीची प्रतिमा मोडून काढावी लागेल. पर्यटकांना सुरक्षित व योग्य वागणूक दिल्यास धार्मिक पर्यटकांची संख्या नक्की वाढेल, असा आशावाद सोलापूर विकास मंच सदस्य विजय जाधव यांनी व्यक्त केला आहे.

तिरुपतीला दररोज आठ रेल्वे

सोलापूरहून तिरुपतीसाठी दररोज आठ रेल्वे जातात. यातील बहुतांश गाड्या मुंबई-पुण्यातूनच फुल्ल होऊन येतात. यामुळे सोलापूरच्या बालाजीभक्तांचे तिकीट कायम प्रतीक्षा यादीत राहते. पूर्वी १२० दिवस अगोदर रेल्वे बुकिंग करता येत होते.

आता हा कालावधी ६० दिवसांवर आला आहे. यामुळे सोलापूरकरांना तिरुपतीला जाणाऱ्या रेल्वेचे तिकीट मिळणे अधिक कठीण झाले आहे. सोलापूरकरांसह परिसरातील धाराशिव, बार्शी येथील अनेक तिरुपतीला जाणारे धार्मिक पर्यटक कलबुर्गी येथून विमानाने जात होते. सध्या कलबुर्गी येथून तिरुपतीला जाणारे विमान बंद असल्याने सोलापूरहून विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळणे शक्य आहे.

अयोध्येला नाही थेट रेल्वे

सोलापूरच्या भक्तांसाठी अयोध्येला जाण्यासाठी थेट रेल्वेसेवा नाही. सध्या रामभक्त सोलापूर- मुंबई व मुंबई-अयोध्या किंवा सोलापूर- झाशी- लखनौ- अयोध्या असा तुटक प्रवास करत आहेत.

या मार्गावर थेट रेल्वे नसल्याने सोलापूर-अयोध्या अशी विमानसेवा सुरू झाल्यास त्याला अधिक चांगला प्रतिसाद मिळू शकतो. किमान साप्ताहिक आणि आठवड्यातून दोन दिवस विमानसेवा सुरू झाल्यास अयोध्या व उत्तर भारतात धार्मिक पर्यटनासाठी जाणाऱ्या भक्तांची चांगली सोय होऊ शकते.

गोवा- कोकणातून अक्कलकोटसाठी येणाऱ्या भक्तांमुळे गोवा विमानसेवेला प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे. तिरुपती व अयोध्या येथील विमानसेवेसाठी इंडिगो कंपनीने सर्व्हे केला आहे. या मार्गावर भविष्यात इंडिगो कंपनीकडून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

सोलापूर व परिसरातून तिरुपतीला नियमित तीन ते पाच हजार भाविक जातात. पूर्वी यापैकी बरेच जण कलबुर्गी येथून विमानाने जात असत.आता ते विमान बंद आहे. सोलापूरहून तिरुपतीला विमान सुरू झाल्यास मोठा प्रतिसाद मिळू शकेल.

 

eNatepute

Share

-