गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड डे:2 फूट उंचीची ज्योती आमगे आणि 7 फूट उंचीची रुमेसा गेल्गीची झाली भेट
जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून नागपुरच्या ज्योती आमगेची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. तर जगातील सर्वाधिक उंचीची महिला म्हणून रुमेसा गेल्गीला हिची नोंद आहे. या दोघींच्या भेटीचा योग गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने “गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड डे’ निमित्त जुळवून आणला. दोघींचीही गिनीज वर्ल्ड रेकॉडचे आयकॉन म्हणून निवड करण्यात आली. यानिमित्ताने दाेघींचीही पहिल्यांदाच लंडनच्या सेवॉय हॉटेलमध्ये भेट झाली. यावेळी दोघींनीही एकत्र चहा पीत काही वेळ सोबत घालवला. त्यांच्यासाठी हा अविस्मरणीय क्षण ठरला. मला भेटणे हे रुमेसा गेल्गी हिचे स्वप्न होते. तिला एकदा तरी मला भेटायचे होते. त्यामुळे मला भेटल्या नंतर रुमेसाला खूप आनंद झाला असे ज्योती आमगे यांनी सांगितले. १८ ते २० नोव्हेंबर असे तीन दिवस आम्ही सोबत होतो. पण, सर्व वेळ मुलाखती, इंटरव्ह्यू आणि फिरण्यात गेला. त्यामुळे वैयक्तिक बोलण्यासाठीच वेळच मिळाला नाही असे ज्योतीने सांगितले. ७ फूट उंच असल्यामुळे रुमेसा गेल्गी यांना व्हिलचेअरवर बसून राहावे लागते. ती आधाराशिवाय उभी राहु शकत नाही असे ज्योती म्हणाली. ज्योती आमगे ही महाराष्ट्राच्या उपराजधानीतील म्हणजेच नागपूरची, तर रुमेसा गेल्गी ही तुर्की येथील रहिवासी आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या वर्धापनदिनानिमित्त त्या लंडनमध्ये भेटल्या. एवढेच नाही तर दोघींनीही एकत्र चहा घेत एकमेकींबद्दल जाणून घेतले. हा पूर्णपणे ‘गर्ल्स डे आऊट’ होता. चहा पीत आणि सोबतीला पेस्ट्री खात दोघींनीही स्वत:ची काळजी, फॅशन, आदींवर चर्चा केली. रुमेसाची उंची २१५.१६ सेंटीमीटर म्हणजेच सात फूट ०.७ इंच असून तिला जगातील सर्वात उंच महिलेचा मान मिळाला. तर ज्योतीची उंची ही केवळ ६२.८ सेंटीमीटर (दोन फूट ०.७ इंच) आहे. ती जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून ओळखली जाते. या दोघींच्याही उंचीत १५२.३६ सेंटीमीटर म्हणजेच पाच फुटाचा फरक आहे. यावेळी रुमेसाने ज्योतीची प्रचंड प्रशंसा केली. ज्योतीसोबतची तिची पहिली भेट म्हणजे संस्मरणीय क्षण असल्याचे सांगितले.