हवा कुणाची, उत्तर महाराष्ट्र, ग्राउंड रिपोर्ट:आयारामांना मानाचे पान, घराण्यांना बंडखोरांचे आव्हान

उत्तर महाराष्ट्र, ग्राउंड रिपोर्ट जरांगेंच्या जाहीर आव्हानामुळे मंत्री महाजन, भुजबळांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आघाडीसमोरही बंडखोरीचे आव्हान मोठे आहे. त्यामुळे बंडोबांच्या खेळावर इथली हवेची दिशा ठरणार आहे. ‘सगळे पक्ष सारखेच आहेत. सर्वांना फक्त जास्त आमदार आणि त्यांच्या माध्यमातून सत्ता हवी आहे. मग आम्ही स्वत:चा विचार करून मतदान केले तर आमची काय चूक?’ हा प्रश्न होता धुळ्यातील एका मध्यमवयीन मतदाराचा. संदर्भ होता पक्षांतर करून संधी साधून घेणाऱ्या उमेदवारांचा आणि त्यांना उमेदवारीसाठी पायघड्या घालणाऱ्या पक्षांचा. त्यात एकाच कुटुंबातील अनेकांना उमेदवारी देणाऱ्या पक्षांनी सामान्यांच्या मनात आणखी संताप निर्माण केल्याचे त्याच्या सोबतच्या इतरांशी बोलताना जाणवत होते. या भावना निर्माण व्हाव्यात अशीच स्थिती उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहे. भुजबळांच्या घरातील एकाला विधान परिषदेत आमदार केल्यानंतर पुन्हा छगन भुजबळ आणि बंडखोर समीर भुजबळ विधानसभेच्या रिंगणात आहेत. मंत्री विजयकुमार गावीत यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर त्यांची कन्या माजी खासदार हिना गावीत यांनी अक्कलकुव्यात बंडखोरी केली आहे. गावितांचे दोन भाऊही रिंगणात आहेतच. नीलेश लंके खासदार झाल्यावर ती गादी शरद पवारांनी त्यांच्या पत्नीला दिली आहे. राधाकृष्ण विखेंचे चिरंजीव लोकसभेत पराभूत झाल्यावर त्यांना पुन्हा विधानसभेत संधी दिली आहे. एकनाथ खडसे आमदार असताना शरद पवारांनी त्यांच्या कन्या राेहिणी यांनाच उमेदवारी दिली आहे. उद्धव ठाकरेेच्या शिवसेनेही ऐनवेळी पक्षात येणाऱ्यांनाच उमेदवारी दिल्याने शिवसैनिक नाराज आहेत. सर्व पक्षांना बंडखोरीचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. उत्तर महाराष्ट्रात पाच जिल्ह्यांत ४७ मतदारसंघ आहेत. त्यात ३३ जागी निवडून आलेले आज महायुतीच्या छत्रीखाली आहेत. यंदा अमित शाहांनी ३३ चा आकडा ४१ पर्यंत नेण्याचे महाआव्हान भाजपचे ‘संकटमोचक’ गिरीश महाजनांना दिले आहे. त्यामुळे अर्ज दाखल केल्यानंतर मी प्रचाराला जामनेर मतदारसंघात येणार नाही, हे त्यांनी जाहीर केले आहे. दुसरीकडे त्यांना पराभूत करण्याचा विडा मराठा मनोज जरांगेंनी उचलला आहे. त्यामुळे दोन्ही अर्थाने महाजनंाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येवला मतदारसंघात ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या जय-पराजयाकडेही सर्वांचे लक्ष आहे. शरद पवारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या एरंडोलमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बंडखोरी होण्याची शक्यता आहे. भाजपने तिकीट नाकारल्याने उद्धव ठाकरेंकडे गेलेल्या माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासाठी ठाकरेंनी आग्रह धरला होता. तिथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेवर गणित अवलंब्लून आहे. महायुतीच्या आमदारांचा उत्तर महाराष्ट्रातला आकडा ३३ वरून ४१ करण्याचे आव्हान भाजपच्या नेत्यांना दिले गेले. एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या यंदा दोन अंकी करतील ही शरद पवारांची अपेक्षा होती. पण ते मुलीमुळे एकाच मतदारसंघात अडकले आहेत.

Share

-