हिंगोली जिल्हयात अपक्षांनी वाढवली डोकेदुखी:हिंगोलीत सर्वात जास्त 40 अपक्षांचा समावेश, उमेदवारी माघारीसाठी साम, दामचा वापर होण्याची चिन्हे
हिंगोली जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवारांनी पक्षीय उमेदवारांची चांगलीच डोकेदुखी वाढवली आहे. हिंगोली विधानसभेत सर्वात जास्त 40 अपक्ष उमेदवार निवडणुक रिंगणात असून आता अपक्षांना अर्ज माघारीसाठी साम, दामचा वापर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरी व हिंगोली विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदार संघात 1015 मतदान केंद्रावरून सुमारे 9.74 लाख मतदार मतदान करणार असून राजकिय पक्षांच्या उमेदवारांसोबतच अपक्षांनीही मतदानाचे गणित लावण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी मतदार याद्यांची चाळणी करण्यास सुरवात झाली असून त्यात आपले मतदान किती व विरोधकांचे मतदान किती याची संख्या काढली जात आहे. दरम्यान, वसमत विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गट विरुध्द राष्ट्रवादी अजित पवार गट, कळमनुरीमध्ये शिंदेसेना विरुध्द ठाकरे सेना तर हिंगोलीत भाजपा विरुध्द ठाकरे सेना अशी लढत होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र त्यामध्ये अपक्ष उमेदवारांनी पक्षीय उमेदवारांच्या मताचे गणित बिघडविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. हिंगोली विधानसभा मतदार संघात 55 उमेदवारांपैकी तब्बल 40 उमेदवार अपक्ष आहेत. यामध्ये काही मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार असून त्यांना आता जरांगे पाटील यांच्या आदेशाची प्रतिक्षा आहे. तर वसमत विधानसभा मतदार संघात 40 उमेदवारांपैकी तब्बल 32 उमेदवार अपक्ष असून कळमनुरी विधानसभा मतादर संघात 33 पैकी 21 उमेदवारांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, तीनही विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवारांनी पक्षीय उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. आता ता. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे अडचणीचे ठरू शकणाऱ्या अपक्ष उमेदवारांना साम, दामचा वापर करून उमेदवारी मागे घेण्यासाठी पक्षीय उमेदवारांकडून मनधरणी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुर्तास पक्षीय उमेदवारांसमोर अपक्षांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.