हिंगोलीत पालिका प्रशासनाचा नोेटीस बॉम्ब:फटाके विक्रेत्यांना बजावल्या नोटीसा, खबरदारीच्या उपाय योजना करण्याच्या सूचना
हिंगोलीत रामलीला मैदानावरील फटाके विक्रेत्यांना पालिका प्रशासनाने नोटीस बॉम्ब टाकला असून ६१ फटाके विक्रेत्यांना नोटीस बजावून खबरदारीचा उपाय योजना हाती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर फटाके विक्रीची दुकाने सुरु करण्यात आली आहेत. या दुकानांवर आता गर्दी होऊ लागली आहे. बच्चे कंपनी सोबतच तरुणाई व जेष्ठ नागरीक देखील फटाके खरेदी करण्यासाठी गर्दी करीत असून त्यामुळे फटाका बाजार फुलला आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळी या दुकानांवर गर्दी होत आहे. दरम्यान, फटाके विक्रीची दुकाने मोठ्या मैदानावर उभारण्यात आली असून या ठिकाणी पालिका मुख्याधिकारी अरविंद मुंडे, अग्नीशमनदलाचे व्यवस्थापक बाळू बांगर यांच्या पथकाने बुधवारी ता. ३० या ठिकाणी येऊन पाहणी केली आहे. यामध्ये दोन दुकानांमधील अंतर, आगी सारखी घटना घडल्यास तातडीने उपाय योजना म्हणून २०० लिटरच्या पाणी भरलेल्या टाक्या, वाळू, आपत्कालीन बाहेर जाण्यासाठी मार्ग दर्शविणारा फलक याची पाहणी केली. मात्र काही ठिकाणी दुकानांमधील अंतर कमी होते तर आपत्कालीन फलक लावले नसल्याचे दिसून आले. या प्रकारानंतर पालिका मुख्याधिकारी मुंडे यांनी ६१ दुकानदारांना नोटीस बजावल्या आहेत. यामध्ये सर्व दुकानदारांनी पाण्याच्या टाक्या भरून ठेवाव्यात, दोन दुकानांमधे अंतर ठेवावे, धुम्रपानास मनाई असा फलक, आपत्कालीन क्रमांक नमुद केलेले फलक उभारावे, फटाके विक्रीनंतर कचरा इतरत्र टाकू नये अशा स्पष्ट सूचना याद्वारे दिल्या आहेत. या पथकाकडून पुन्हा पाहणी केली जाणार असून अटी व शर्तीचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी मुंडे यांनी दिला आहे. या शिवाय रामलीला मैदानावर पालिकेचे अग्नीशमन पथक 24 तास कार्यरत ठेवण्याच्या सुचनाही त्यांनी अग्नीशमन दलास दिल्या आहेत.