विधानसभेत आम्ही महाविकास आघाडी धुवून काढली:लोकसभेच्या निवडणुकीवेळी आम्ही ओव्हर कॉन्फिडंसमध्ये होतो- CM देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात मुलाखत देताना अनेक विषयांवर भाष्य केले. लोकसभा निवडणुकीत आम्ही ओव्हर कॉन्फिडंसमध्ये होतो आणि महाविकास आघाडी देखील होती. मात्र विधानसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीचा फेक नरेटीव्हचा फुगा एका मिनिटांत फोडला आणि पूर्ण महाविकास आघाडी धुवून काढली, असा टोला फडणवीस यांनी यावेळी बोलताना लगावला. तसेच शरद पवारांनी संघाचे कौतुक केले त्यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. कधी शिंदे साहेब नाराज होते तर कधी अजित पवार
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही ठरवले होते की सगळ्या चर्चा करून सरकार तयार करू. त्यामुळे जरा कालावधी लागला. यात कधी एकनाथ शिंदे नाराज, कधी अजित पवार नाराज. आता माध्यमांना देखील दोष देता येत नाही, त्यामुळे बातमी मिळाली तर ठीक नाहीतर काहीतरी बनवावी लागते. कधी कधी आम्ही लोक बातम्या तयार करतो. पण मला असे वाटत नाही की त्यात फार काही अटी शर्ती टाकल्या आणि शिंदे साहेबांनी ते तात्काळ स्वीकारले. एकनाथ शिंदे फारसे हसत नाहीत
देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिंदे साहेबांच्या समोर तोच प्रश्न होता की मुख्यमंत्री होतो आणि आता उपमुख्यमंत्री व्हावे की नाही. त्यामुळे मी त्यांना माझा अनुभव सांगितला, मी म्हंटले की तुम्हाला पक्ष चालवायचा आहे. माझा पक्ष तर असा आहे की अनेक नेते आहेत, दिल्लीत वरिष्ठ आहेत. पण तुमचा पक्ष हा तुमच्या एका खांबावर उभा आहे. विभाजन झाल्यानंतर चांगले यश मिळालेला तुमचा पक्ष आहे त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये आले पाहिजे. आता तुम्ही माझे चेहऱ्यावर नेहमी हास्य पाहिले असेल, पण त्यांचा चेहरा असा आहे की त्यांच्या चेहऱ्यावर फारसे हास्य नसते. पण ते मुख्यमंत्री असताना देखील त्यांचा तसा चेहरा होता पण तेव्हा कोणी बोलले नाही. आणि आता उपमुख्यमंत्री झाल्यावर बघा शिंदे साहेब हसतच नाहीत, असा एक समज तयार झाला. महाराष्ट्रात आपण पाहिले आहे की एक संस्कृती आहे. दक्षिणेत पाहिले तर तिथे दोन पक्षाचे नेते एकमेकांशी बोलत नाहीत. तसे इथे नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर माझे पहिल्याच भाषणात सांगितले की मला महाराष्ट्राची राजकीय परंपरा परत आणायची आहे. मला बदल घडवणारे राजकारण करायचे आहे बदला घेण्याचे नाही. मला असे वाटते की त्याला प्रतिसाद सगळ्याच नेत्यांनी दिला. त्यामुळे सगळ्या पक्षाचे नेते एकमेकांना भेटत आहेत. शरद पवार अतिशय चाणाक्ष
शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले होते, त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत ज्यावेळी एक फेक नरेटीव्ह तयार करण्यात महाराष्ट्रात यश आले तेव्हा महाविकास आघाडीला ओव्हरकॉन्फिडन्स आला की आम्ही ही निवडणूक आता जिंकू. आमच्यासाठी तो एक धक्का होता. तेव्हा माझ्यासह सगळेच ओव्हरकॉन्फिडन्समध्ये होतो. कारण आम्हाला असे वाटले की या फेक नरेटीव्हचा जनतेवर काही परिणाम होणार नाही, त्यांनी जे व्होट जिहाद चालू केले होते त्याचा परिणाम होणार नाही असे आम्हाला वाटले होते. पण दुर्दैवाने त्याचा परिणाम झालेला बघितला आणि महाराष्ट्राच्या निवडणुका देखील जवळ आल्या होत्या. तेव्हा आम्ही विचार संघाला सांगितले की राजकारणात तुम्ही काम करत नाही, पण सध्या जे अराजकतावादी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्या विरोधात आपल्याला राष्ट्रीयशक्तींच्या विचारांनी उतरण्याची गरज आहे. मला असे वाटते की राष्ट्रीय विचाराच्या ज्या शक्ती आहेत याचा मूळ परिवार हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. तसेच विविध क्षेत्रातील लोकांनी एकत्र येत अराजकतावादी शक्तीच्या विरोधात राष्ट्रीयशक्ती निर्माण करण्याचे योगदान दिले. त्यामुळे जो फेक नरेटीव्हचा मोठा फुगा जो तयार झाला होता, तो एका टाचणीने फोडण्यात आला आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी पूर्णपणे धुवून निघाली. शरद पवार अतिशय चाणाक्ष आहेत. त्यांनी निश्चितपणे याचा विचार केला असेल की आम्ही एवढे मोठे तयार केलेले वायु मंडल हे एका मिनिटात पंक्चर झाले, हे कसे शक्य झाले? यामागे अदृश्य शक्ती कोण आणि त्यांना लक्षात आले की ही शक्ती जी आहे ही नियमित राजकारण करणारी शक्ती नाही, हे राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे. त्यातून मग त्यांनी प्रतिस्पर्ध्याचे कौतुक करावे तसे कौतुक केले असावे. राजकारणात काहीही होऊ शकते
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, 2019 पासून माझ्या विधानांमध्ये बदल झाला आहे. 2019 ते 2024 या काळात जे काही घडले त्यातून मी एक गोष्ट शिकलो ती म्हणजे ‘नेव्हर से नेव्हर’. ही गोष्ट होणार नाही असे म्हणून चालायचेच नाही. राजकारणात काहीही होऊ शकते. म्हणजे ते झालेच पाहिजे असे नाही. उद्धव ठाकरे तिकडे जातात, अजित पवार इकडे येतात, त्यामुळे काहीही होऊ शकते. त्यामुळे राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही आणि होणारही नाही असे म्हणून चालत नाही.

Share

-