दीड टक्का मते घेतल्याने मनसेची मान्यता, इंजिन चिन्ह धोक्यात?:एकूण मतदानापैकी 8 टक्के मते व 1 जागा जिंकणे आवश्यक

एकदा हातात सत्ता द्या, महाराष्ट्र मी सुतासारखा सरळ करतो, अशी प्रत्येक प्रचारसंभातून गर्जना करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेला विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळवता आली नाही. यंदाच्या निवडणुकीत मनसेला अवघे १.५५ टक्के म्हणजेच १० लाख मते मिळाली आहेत. मात्र, निवडणूक आयोगाच्या निकषानुसार, निवडणुकीत झालेल्या एकूण मतदानापैकी ८ टक्के मते आणि १ जागा जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे मनसेची मान्यता रद्द होऊन, इंजिन हे पक्ष चिन्ह ही जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे एमआयएमला निवडणुकीत ५ लाख मते मिळाली असून त्यांचा एक आमदार निवडून आला आहे.निवडणूक प्रचारसंभामधून राळ उठवणारे राज ठाकरे यांना आपल्या मुलासह एकाही शिलेदाराला निवडून आणता आले नाही. माहिममधून पुत्र अमित ठाकरेंचा पराभव हा राज ठाकरेंसाठी मोठा धक्का समजला जात आहे. मागील २ निवडणुकांमध्ये मनसेचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला होता मात्र यंदा एक आमदारही टिकवता आला नाही. निवडणुकीत राज्यात ६६. ०५ टक्के मतदान झाले. या मतदानात एकूण ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी आपला सहभाग नोंदवला आहे. यामध्ये पुरूष मतदार एकूण ३ कोटी ३४ लाख ३७ हजार ५७, तर ३ कोटी ६ लाख ४९ हजार ३१८ महिलांनी मतदान केले आहे, निवडणूक आयेागाच्या निकषानुसार मनसेला ४८ लाख मत मिळणं आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात मनसेला १० लाख मते मिळाली आहेत. निवडणूक आयोगाच्या निकषानुसार मनसेला या निवडणुकीत मते मिळवता आलेली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून मनसेची मान्यता रद्द का करू नये यासाठी नोटीस बजावू शकते असे तज्ञांचे म्हणणे आहे. राज ठाकरे यांनी सोमवारी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांची चिंतन बैठक बोलावली आहे.

Share

-