जलवाहिनीची दुरुस्ती लांबल्याने 50 हजारांवर कुटुंबे पाण्याविना:फुटलेल्या पाइपचे पाणी नव्या जलवाहिनीत शिरल्याने फटका

शहराला पाणीपुरवठा करणारी ९०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकळी फाटा येथे सोमवारी (१० मार्च) निखळली. यामुळे शहरात २२ दशलक्ष लिटर पाणी कमी येत आहे. परिणामी, शहरातील पाण्याचा टप्पा पुढे ढकलला आहे. जुन्या शहरातील बहुतांश भागांत गेल्या १० दिवसांपासून पाणी आलेले नाही. त्यामुळे जुन्या शहरासह सिडको, हडको, गारखेडा, उस्मानपुरा आदी भागांतील सुमारे ५० हजार कुटुंबांना पाणीबाणीचा सामना करावा लागत आहे. फुटलेल्या जलवाहिनीतील पाणी सध्या नव्या जलवाहिनीत टाकण्यात येत असलेल्या २,५०० मिमीच्या जलवाहिनीत शिरले आहे. हे पाणी काढल्याशिवाय जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेता येणार नाही. रात्री उशिरापर्यंत तुंबलेले पाणी काढणेसुरू होते. त्यामुळे बुधवारीही जलवाहिनी दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. ‘जल बेल’वर माहिती नाही नागरिकांना पाण्याची वेळ कळावी यासाठी मनपाने ‘जल बेल’ हे अॅप विकसित केले आहे. मंगळवारी टप्प्पे पुढे गेले होते. मात्र, याची माहिती ॲपवर नव्हती. बुधवारीही अनेक भागांत पाणी येणार नाही. त्याबाबत कोणतीही माहिती ॲपवर दिली नाही. काही टप्पे पुढे सरकले जलवाहिनी फुटल्याने शहराला पाणीपुरवठ्यात २० ‘एमएलडी’ची घट झाली आहे. आज जलवाहिनी जोडल्यास पाणीपुरवठा सुरळीत होईल. काही ठिकाणी टप्पे पुढे सरकले आहेत. ते पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न आहे. – के. एम. फालक, कार्यकारी अभियंता. पूर्ण जलवाहिनीची हायड्राॅलिक चाचणी आवश्यक जीवन प्राधिकरणाकडून गर्दी असलेल्या तीन ठिकाणी हायड्रॉलिक चाचणी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ३९ किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीला सुमारे साडेसहा हजारांपेक्षा जास्त वेल्डिंग जॉइंट आहेत. यामुळे पूर्ण जलवाहिनीची हायड्रॉलिक टेस्टिंग न झाल्यास भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो, असे नाव न सांगण्याच्या अटीवर मनपाच्या अभियंत्याने सांगितले. आजही पाणी मिळणे अनिश्चित नवीन पाणी योजनेच्या २,५०० मिमी पाइपलाइनमध्ये घुसलेले पाणी काढण्यासाठी मंगळवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला यंत्रसामग्री, मनपाच्या कंत्राटदाराने मनुष्यबळ दिले. मात्र, रात्री उशिरापर्यंत पाणी बाहेर काढण्यात यश आले नाही. जलवाहिनी रिकामी करून साचलेल्या पाण्याचा निचरा झाल्याशिवाय काम करता येणार नाही. त्यामुळे बुधवारी पाणी मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.