जरांगे यांचा मुस्लीम धर्मगुरू, ज्येष्ठ दलित नेत्यांशी आज संवाद:म्हणाले ‘दलित-मराठा-मुस्लिम एक झाले तरच आमदार होतील’

विधानसभा निवडणुकीत उमेदवार द्यायचे की नाही, या संदर्भात चर्चा करण्यासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज बैठक बोलावली आहे. त्यांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अजून काही समीकरणे जुळवणे बाकी असल्याने त्यांनी हा निर्णय दिवाळीच्या पाडव्याला म्हणजेच 2 नोव्हेंबरला जाहीर करणार असल्याचे सांगिले आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर त्यांनी मुस्लीम धर्मगुरु, दलित समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांशी संवाद साधण्यासाठी आज बैठक बोलावली आहे. केवळ एकट्या मराठा समाजामुळे निवडणुकीत यश मिळणार नाही. त्यामुळे मुस्लिम व दलित समाजाशीही समीकरणे जुळवण्याचा जरांगे पाटील प्रयत्न करत आहेत. याच संदर्भात एक निर्णायक बैठक आज आंतरवाली सराटी येथे बोलावली आहे. या बैठकीसाठी काही धर्मगुरू विमानाने तर काही हेलिकॉप्टरने येणार आहेत. त्यामुळे समाजबांधवांनी आंतरवाली सराटी गावात येऊन गर्दी करू नये, असे आवाहन जरांगे यांनी केले. या बैठकीत काय निर्णय होतो हे आताच सांगता येणार नाही. परंतु, दिवाळी पाडव्याचा मुहूर्त चांगला असल्याने त्याच दिवशी आपण विधानभा निवडणुकीत उमेदवार द्यायचे की नाही याचा निर्णय घेऊ, असे जरांगेंनी सांगितले. दलित-मराठा-मुस्लिम एक झाले तरच आमदार होतील दलित-मराठा-मुस्लिम शहाणे होणे गरजेचे आहे. तरच आमचे उमेदवार निवडून येतील. कधी चेहरा न बघितलेली शेतकऱ्यांची मुले आमदार होतील. मुस्लिम समाजातील मुलांनाही आमदार, मंत्री होता येईल. हे सुंदर स्वप्न पूर्ण होण्यासाठी ही समीकरणे जुळायला हवी, त्यासाठी बैठक घेत असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. सततच्या बैठकांमुळे मनोज जरांगे यांच्या पायाला सूज, सलाइन लावले गेल्या आठवडाभरापासून जरांगे दररोज सातत्याने बैठका घेत आहेत. अनेक राजकीय नेते, इच्छूक उमेदवार त्यांना रात्री- बेरात्री, पहाटे भेटीसाठी येत आहेत. या अति बैठकांमुळे त्यांचे पाय सुजले आहेत. वेदनाही होत असल्याने उपचार सुरु आहेत. बुधवारी त्यांना सलाइनही लावले होते. ‘दोन दिवस सर्वांशी चर्चा करत आहोत. त्यामुळे पाडव्यापर्यंत कुणीही आंतरवालीत येऊ नये’ असे आवाहन त्यांनी केले आहे. कुणालाही पैसे देऊ नका निवडणुकीसाठीसाठी माझ्या नावाने कुणी पैसे मागत असेल तर देऊ नका. मी पैशांवर पाठिंबा देतो असे सांगणाऱ्याचे नाव कळले तर मी त्या माणसाचा मुडदाच पाडणार. इथे पैशांचा विषय नाही तर समाजाचा विषय आहे, असे जरांगे यांनी सांगितले. फडणवीस यांच्यावर टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले, ‘ज्यांच्याशी 40 वर्षे जमले नाही अशा लोकांना सोबत घेऊन ‘यांनी’ सत्ता मिळवली. त्यांच्यासारखा विश्वासघातकी माणूस आज राजकारणात कुणीच नाही.’

Share

-