मनोज जरांगेंचा मोठा दावा – मी आणि मराठा समाज निवडणुकीच्या मैदानात असतो तर…

पंढरपूर : राज्यातील निवडणूक निकालानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मोठा राजकीय दावा केला. “मी आणि मराठा समाज विधानसभा निवडणुकीच्या मैदानात असतो आणि समीकरण जुळले असते तर सगळ्यांचा सुपडासाफ केला असता, असा अप्रत्यक्ष टोला मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला आहे.

मराठा समाज कोणाच्या दावणीला बांधणार नाही. समाज स्वतःचा मालक आहे. मी समाजावर मनमानी केली नाही आणि करणारही नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे यांनी रविवारी रात्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य केले.

‘मी आरक्षण घेणार आणि तेही ओबीसीमधूनच घेणार’

गोरगरिबांना शक्ती मिळावी, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा असे आपण विठ्ठलाला साकडे घातल्याचे ही जरांगे यांनी सांगितले. जरांगे पुढे म्हणाले, राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची बैठक बोलावली जाईल. त्यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. मी आरक्षण घेणार आणि ओबीसीमधूनच घेणार, यासाठी मराठा समाजाच्या (Maratha Community) आरक्षणासाठी अंतरवालीच्या घराघरांत उपोषण केले जाणार आहे. समाजातल्या अनेकांची इच्छा आहे की, मुंबईत जाऊन उपोषण करावे तसे सुद्धा होऊ शकते. मात्र, सरकार स्थापन झाल्यानंतर याबाबत दिशा ठरवली जाईल.

विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 30 ते 32 नवनिर्वाचित आमदारांनी आपली भेट घेतली आहे. सरकार स्थापन झाल्यावर अजून अनेक आमदार आपली भेट घेतील, असा दावा ही त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या मैदानात मी आणि माझा मराठा समाज नव्हता. आमचं समीकरण जुळलं असतं तर सगळ्यांचा सुपडा साफ केला असता, मी समाजाला कोणाच्या दावणीला बांधलं नाही, त्याला विकले नाही. समाज त्याच्या मताचा मालक आहे. समाजाला जे वाटलं ते त्यांनी केले आहे. समाजावर कुठेही मनमानी केली नाही, असे स्पष्टीकरण ही जरांगे यांनी दिले.

जरांगे पाटलांवर जेसीबीमधून पुष्पवृष्टी

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आपण त्यांचे स्वागत करणार का असा प्रश्न जरांगे यांना विचारला असता, त्यांनी जर तरच्या प्रश्नांना‌ मी उत्तर देत नाही असे म्हणत त्यांच्या आधी तुम्हालाच घाई झाली का? असा प्रतिप्रश्न करत अधिक बोलणे टाळले. तर, छगन भुजबळ यांच्या विरोधात आपण भूमिका घेतली होती असे विचारले असता यावरही त्यांनी थातूरमातूर उत्तर देत घुमजाव केले. यावेळी मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटील यांच्यावर जेसीबीमधून पुष्पवृष्टी करून स्वागत केले.

eNatepute

Share

-