ऐन गणेशोत्सवात हवामान खात्याकडून पावसाचा इशारा; कोकणात पुढील दोन दिवस मुसळधार

रत्नागिरी : ऐन गणेशोत्सवात हवामान खात्याने कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान खाते कुलाबा, मुंबई यांच्याकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार, १ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. शुक्रवारी पावसाचा रेड अलर्ट जारी केला असल्याने प्रशासनाने किनारी भागासह दुर्गम भागात सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह काही भागात जोरदार पाऊस झाला. दिवसभरात रत्नागिरी जिल्ह्यात १६.४८ मि.मी.च्या सरासरीने एकूण १४८.३० मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये खेड, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तसंच लांजा, राजापूर, मंडणगड तालुक्यात १० ते १५ मि. मी. पावसाची नोंद झाली.

दरम्यान, गेले दोन दिवस जिल्ह्यातील उष्णतेतही वाढ झाली आहे. सणाचे दिवस असल्याने संभाव्य नैसर्गिक आपत्तीसह दुर्घटना घडू नये, यासाठी आपत्ती निवारण पथकांना विशेषतः नदी आणि सागरी किनाऱ्यांवर सज्जतेच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published.