ठाणे : कळवा रुग्णालयाच्या अपघात विभागातील डॉक्टर्स राजीनाम्याच्या तयारीत

अपुऱ्या मनुष्यबळामुळे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावरील ताण वाढला असताना अपघात विभागातील सर्वच डॉक्टर राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ अनिरुद्ध माळगांवकर यांच्या त्रासाला कंटाळून हे सर्व डॉक्टर्स राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठाणे : कळवा रुग्णालयाच्या अपघात विभागातील डॉक्टर्स राजीनाम्याच्या तयारीत

वृत्तसेवा : अपुऱ्या मनुष्यबळामुळे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावरील ताण वाढला असताना अपघात विभागातील सर्वच डॉक्टर राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ अनिरुद्ध माळगांवकर यांच्या त्रासाला कंटाळून हे सर्व डॉक्टर्स राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान अपघात विभागात अपघाताच्या दररोजच्या केसेसचे प्रमाण हे २०० वर गेले असून जर या सर्व डॉक्टर्सने एकत्रित राजीनामा दिला तर अपघात विभागाची यंत्रणाच ठप्प होण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयातील विविध विभागापैकी अपघात विभाग हा महत्वाचा विभाग असून सामान्य रुग्णालयाचे स्थलांतर झाल्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या अपघातांच्या केसेसचे प्रमाण देखील वाढले आहे. पूर्वी प्रत्येक दिवशी २६० ते २७० केसेस या अपघाताच्या येत होत्या. मात्र हेच प्रमाण आता ३७० वर गेले असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. सध्या इतर केसेस आणि अपघातांच्या केसस येण्याचे प्रमाण वाढल्याने रुग्णालयातील डॉक्टरांची विशेष करून अपघात विभागातील डॉक्टरांची अक्षरशः दमछाक होत आहे. या विभागात एकूण सहा डॉक्टर्स काम कार्यरत आहेत. अपघात झालेल्यांवर उपचार करायचे कि वरिष्ठांचा मानसिक त्रास सहन करायचा अशा दुविधा अवस्थेत सध्या हे सर्व डॉक्टर्स आहेत. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अनिरुद्ध माळगांवकर हे मानसिक त्रास देत असल्याचे इथल्या डॉक्टर्सचे म्हणणे असून नाव न सांगण्याच्या अटींवर त्यांनी ही माहिती दिली आहे.

यासंदर्भात पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी माहिती घेतल्यानंतर यावर भाष्य केले जाईल असे अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र यामागे शिस्तीचा भाग असल्याचेही त्यांनी सांगितले. केवळ या प्रकरणावर न बोलता एकंदर शिस्त लागणेही महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

अपुऱ्या मनुष्यबळामुळे तारेवरची कसरत…

अपघात विभागात सहा डॉक्टर्स काम कार्यरत असून सध्या या विभागात येणाऱ्या केसेसचे प्रमाण अधिक असल्याने हे मनुष्यबळ अपुरे असल्याने रोजच अपघात विभागातील डॉक्टरांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. गेल्या आठवड्यात पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रांना त्याच दिवशी पत्र पाठवले असून अपघात विभागात तसेच तातडीच्या विभागात आरोग्य केंद्रातील डॉक्टर्सना पाठवण्यात यावे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. हे पत्र स्वतः आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट केले आहे. त्यामुळे याची अंमलबजावणी तातडीने होते का नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.