सचिन तेंडुलकर, बिग बी आणि अदानींचे व्याह्यांच्या बंगल्याचे रुपडं पालटणार, वाढीव मजल्यांच्या बांधकामाला परवानगी

Mumbai seaface buglows CRZ rules | सचिन तेंडुलकरच्या आताच्या बंगल्यात सहा हजार चौरस फूट जागेत तळमजला अधिक साडेतीन माळ्यांचे बांधकाम आहे. याठिकाणी अतिरिक्त बांधकाम करण्याची परवानगी.

सचिन तेंडुलकर, बिग बी आणि अदानींचे व्याह्यांच्या बंगल्याचे रुपडं पालटणार, वाढीव मजल्यांच्या बांधकामाला परवानगी

मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना त्यांच्या बंगल्यांमधील अतिरिक्त कामकाजासाठी सागरी नियमन क्षेत्र कायद्यातंर्गत (CRZ) परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर आणि बच्चन कुटुंबीयांना आता आपल्या बंगल्यांमध्ये नव्याने बांधकाम करता येईल. मुंबईतील कार्टर रोड परिसरात समुद्राला लागून सचिन तेंडुलकरचा बंगला आहे. या बंगल्याच्या बांधाकामाचे स्वरुप सध्या अप्पर बेसमेंट, लोवर बेसमेंट, तळमजला प्लस तीन मजले असे आहे. चौथ्या मजल्याचा भाग तेंडुलकर कुटुंबीयांकडून राहण्यासाठी वापरला जातो. या बंगल्याच्या बांधकामाला २०११ साली मंजुरी देण्यात आली होती. सागरी हद्दीत येत असल्याने सचिनच्या बंगल्याला अवघा १ फ्लोअर स्पेस इंडेक्स (FSI) देण्यात आला होता. त्यामुळे सचिन आणि अंजली तेंडुलकर यांनी या बंगल्यात अतिरिक्त बांधकामाच्या परवानगीसाठी अर्ज केला होता.सचिन तेंडुलकरने दिलेल्या अर्जानुसार त्यांना बंगल्याचा चौथा आणि पाचवा मजला बांधायचा आहे. जादाचा FSI आणि विकासाचा हक्क मिळवण्यासाठी सचिन तेंडुलकरकडून प्रीमियम भरण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. त्यानुसार सीआरझेड कायद्यातंर्गत सचिन तेंडुलकर यांना बंगल्यातील अतिरिक्त कामकाजाला परवानगी देण्यात आली आहे.

त्यामुळे आता तेंडुलकर कुटुंबीयांना चौथ्या मजल्यावरील बांधकाम आणि पाचवा मजला उभारण्याची मुभा मिळाली आहे.तर दुसरीकडे जया बच्चन यांच्याकडूनही त्यांच्या बंगल्याच्या कामकाजात बदल करण्यासाठी सीआरझेडची परवानगी मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. जुहू येथील कपोल सोसायटीमध्ये बच्चन कुटुंबीयांचा जलसा हा बंगला आहे. या बंगल्याच्या बांधकामाला १९८४ मध्ये परवानगी देण्यात आली होती. बेसमेंट, ग्राऊंड प्लस २ अप्पर फ्लोअर अशी या बंगल्याची रचना आहे. मात्र, नव्या अर्जानुसार जलसा बंगल्याचा दुसरा मजला पूर्णपणे बांधायचा आहे. सध्या दुसऱ्या मजल्यावरील काही भागातच बांधकाम आहे. तसेच राहण्यासाठी आणखी एक मजला बांधता यावा, यासाठी बच्चन यांच्याकडून परवानगीचा अर्ज करण्यात आला होता. यासंदर्भात बच्चन यांचा प्रस्ताव निकषात बसत असल्यामुळे या बांधकामाला परवानगी देण्यात आला आहे. याशिवाय, गौतम अदानी यांचे व्याही असलेल्या सिरिल श्रॉफ यांच्या वरळी सीफेसवरील बंगल्याच्या वाढीव बांधकामासही मंजुरी देण्यात आली आहे. २०१९ मधील सीआरझेड अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी, शर्थींच्या अधीन राहूनच वाढीव बांधकाम करावे लागेल, असे मंजुरी देताना स्पष्ट केले आहे. वाढीव बांधकाम करताना तयार होणारा मलबा सीआरझेड क्षेत्रात टाकता येणार नाही, अशी अट या सगळ्यांना घालण्यात आली आहे.