ठिबक’साठी ८० टक्के सबसिडी! १२३१० शेतकऱ्यांसाठी १०.२३ कोटी रुपये ‘कृषी’कडे वर्ग

ठिबक’साठी ८० टक्के सबसिडी! १२३१० शेतकऱ्यांसाठी १०.२३ कोटी रुपये ‘कृषी’कडे वर्ग

सोलापूर : सन २०१९-२० या वित्तीय वर्षात शेतकऱ्यांना ठिबक सिंचनातील राज्य सरकारची टॉपअप सबसिडी मिळालेली नव्हती. आता राज्य शासनाने सोलापूर जिल्ह्यासाठी सव्वादहा कोटींचा निधी प्राप्त दिला आहे. त्यातून अडीच वर्षांपासून सबसिडीच्या प्रतीक्षेतील १२ हजार ३१० शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम मिळणार आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के तर सर्वसाधारण शेतकऱ्यांना ४५ टक्के सबसिडी मिळते. या योजनेअंतर्गत पाच हेक्टरपर्यंत क्षेत्राची मर्यादा आहे. दरम्यान, ठिबकाखालील क्षेत्र वाढावे म्हणून राज्य सरकारने ८० टक्के सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यातून सर्वसाधारण शेतकऱ्यांना ३५ टक्के तर इतर शेतकऱ्यांना २५ टक्के टॉपअप सबसिडीचा हिस्सा राज्य सरकारकडून दिली जाते. त्याच टॉपअपचा २०१९-२० मधील सव्वादहा कोटी रुपये आता कृषी विभागाला प्राप्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात थेट सबसिडीची रक्कम वर्ग केली जाणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख हेक्टरवरील क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आले आहे.

राज्य सरकारने सबसिडीची रक्कम ८० टक्क्यांपर्यंत नेल्याने ठिबक सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कमीतकमी पाण्यात अधिक उत्पन्न घेता येते हे समिकरण शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने आता ठिबक करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याची स्थिती पहायला मिळत आहे.

ठिबक’चे तालुकानिहाय लाभार्थी

तालुका लाभार्थी सबिसिडी

 • बार्शी २,८८५ १,५१,६५०००

 • करमाळा १,३७४ १,६७,७१,०००

 • माढा १,६१२ १,६३,१८,०००

 • मोहोळ १,३०६ १,२९,६५,०००

 • पंढरपूर १,३९९ १,०३,३९,०००

 • सांगोला १,२१६ ८४,५५,०००

 • मंगळवेढा ८९६ ६२,९८,०००

 • द. सोलापूर ६६२ ७१,९४,०००

 • उ. सोलापूर ४९७ ३८,७०,०००

 • अक्कलकोट ३७३ ५०,१०,०००

 • एकूण १२,३१० १०,२३,८५,०००