खड्डे बुजवा अन् जीव वाचवा..! नागरिकांचे महापालिकेला आवाहन

हडपसर वृत्तसेवा :  अण्णासाहेब मगर महाविद्यालयामागे असलेल्या रस्त्यावर दीड ते दोन फूट खोल खड्डे पडले आहेत. त्यात सध्या पावसाचे पाणी साचले असल्याने वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. महापालिका प्रशासनाकडून मात्र रस्तादुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. मोठा अपघात होण्याआधी खड्डे बुजवा व जीव वाचवा, असे आवाहन नागरिकांनी महापालिकेला केले आहे.

या रस्त्याला लागून एका बाजूला मगर महाविद्यालय, तर दुसर्‍या बाजूला पूनावाला शाळा आहे. सीरम कंपनी व हडपसर परिसरात जाणारे कामगार तसेच नागरिकदेखील या रस्त्याचा वापर करतात. यामुळे या मार्गावर विद्यार्थी, पालक व नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच विद्यार्थी व नागरिकांना जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून चालावे लागत आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्याने वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने छोटे, मोठे अपघातही होत आहेत.

मांजरी बुद्रुक पाणी योजनेची जलवाहिनी टाकण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून हा रस्ता खोदण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या दुरुस्तीचे काम योग्य पद्धतीने करण्यात आले नाही. त्यामुळे सध्या हा रस्ता उखडला असून, त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडत आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे व अवजड वाहतुकीमुळे सुमारे दोनशे मीटर अंतरात या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे परिसरातील रहिवासी अमर तुपे, शिवाजी भाडळे, बाळासाहेब विभुते, सूरज घुले, धनराज घुले,यांनी सांगितले.
याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता महादेव देवकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

मनसेचा आंदोलनाचा इशारा
दरम्यान, या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते अजय जाधव यांनी बॅनर लावून त्यावर उपहासात्मक मजकूर प्रसिद्ध केला असून, नागरिकांना सावधानतेची सूचना दिली आहे. महापालिकेने लवकरात लवकर रस्ता दुरुस्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.