गोटखिंडीचा गणेशोत्सव बनला हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक, ४३ वर्षांपासून मशिदीत बसतो गणपती, अशी झाली सुरुवात

सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी या छोट्याशा गावाने हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरा जपली आहे. या गावात गेल्या ४३ वर्षांपासून मशिदीमध्ये गणपती बसवला जात आहे.

Sep 26, 2023 - 17:18
Sep 26, 2023 - 17:21
 0
गोटखिंडीचा गणेशोत्सव बनला हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक, ४३ वर्षांपासून मशिदीत बसतो गणपती, अशी झाली सुरुवात

सांगली: जिल्ह्यामध्ये गोटखिंडी हे असे गाव आहे की जिथं मुस्लीम समाज आपल्या मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करून हिंदू मुस्लीम ऐक्याचं दर्शन घडवत आहे. गेल्या ४३ वर्षांपासून मुस्लीम समाज ही परंपरा जोपासत आहे. ४३ वर्षांपूर्वी गोटखिंडी गावात झुंजार चौकामध्ये नेहमीप्रमाणे हिंदू बांधवांनी गणपती बसवला होता. त्यावेळी प्रचंड पाऊस झाला आणि मंडळामध्ये बसवलेल्या गणपतीच्या मूर्तीवर पाणी गळू लागले. तेव्हा त्या गणेश मंडळाच्या मागच्याच बाजूला असलेल्या मशिदीतील बुजुर्ग मंडळींनी गणपतीच्या मूर्तीला मशिदीत आणून ठेवण्यास सांगितले. गणपतीचे पावसापासून रक्षण झाले. पुढच्या वर्षी गावात एक बैठक घेतली गेली. या मशिदीतच गणपतीची स्थापना करण्याचे ठरले. दोन्ही समाजाने या निर्णयास मान्यता दिली. त्यामुळे आता दरवर्षी या मशिदीतच गणपतीची प्राणप्रतिष्ठपणा होऊ लागली. मुस्लीम बांधव या गणपतीची मनोभावे पूजा , अर्चना , आरती करून प्रसादाचे वाटप करतात. सर्व गावकरी यावेळी या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे २००९ मध्ये गणपतीच्या काळातच मोठी हिंदू मुस्लीम दंगल झाली होती. दोन्ही समाजात त्यावेळी मोठी तेढ निर्माण झाली होती. पण, गोटखिंडी गावात अशा निकराच्या प्रसंगी सुद्धा हिंदू मुस्लीम ऐक्य अबाधित राहिलं.धार्मिक सलोखा अबाधित राहिला. गोटखिंडीमध्ये हे दोन्ही समाज एकोप्याने , गुण्या गोविंदाने राहतात. आजच्या दूषित सामाजिक वातावरणात असे सामाजिक धार्मिक ऐक्याचे चित्र तसे दुर्मिळच आहे. गणपतीच्या काळात म्हणजे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीच्या काळात दोन तीनदा मोहरम आणि बकरी ईद हे मुस्लिम बांधवांचे सण एकत्रितपणे आले होते. तेव्हाही मुस्लिम समाजाने त्या काळात कुर्बानी न देता हा सण अनंत चतुर्दशीच्या नंतर साजरा केला होता. याच काळात एकदा मोहरमचा सण आला होता तेव्हा त्यांनी मोहरमच्या पंजांची स्थापना आणि गणपतीची स्थापना एकाच ठिकाणी केली होती. इतका एकोपा या गावातील दोन्ही समाजाचे बांधव जपत आहेत हे अत्यंत कौतुकास्पद आहे. असे उपक्रम सर्वत्र व्हायला हवेत. त्यामुळे आपण सर्व धर्मीय लोक एका समाजात गुण्यागोवंदाने राहू शकू.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow