नव्या वर्षाची वाटचाल कचरामुक्त शहराकडे

शहरातील मुख्य नवीन रस्त्यांनंतर आता शहर कचरामुक्त करण्याचा नवा वर्षाचा नवा संकल्प महापालिका प्रशासनाने केला आहे. दोन दिवसांतून एकदा नव्हे तर आता दिवसातून दोनवेळा घंटागाड्या मार्गावर धावण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा घनकचरा विभागाकडून तयार करण्यात येत आहे. शहरातील अधिकाधिक कचरा संकलन करून शहर १०० टक्के कचरामुक्त करण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे.

नव्या वर्षाची वाटचाल कचरामुक्त शहराकडे

शहरातील मुख्य नवीन रस्त्यांनंतर आता शहर कचरामुक्त करण्याचा नवा वर्षाचा नवा संकल्प महापालिका प्रशासनाने केला आहे. दोन दिवसांतून एकदा नव्हे तर आता दिवसातून दोनवेळा घंटागाड्या मार्गावर धावण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा घनकचरा विभागाकडून तयार करण्यात येत आहे. शहरातील अधिकाधिक कचरा संकलन करून शहर १०० टक्के कचरामुक्त करण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे.

शहरातील कचरा संकलनासाठी विभागीय कार्यालयनिहाय घंटागाड्यांच्या मार्गांची वर्गवारी करून रोड मॅप तयार करण्यात आला आहे. या मॅपनुसार काही परिसरात दररोज सकाळी, तर काही ठिकाणी दुपारी तर कुठे दोन दिवसांआड अशा पद्धतीने घंटागाड्या शहरात कचरा संकलनासाठी फिरत आहेत. बायोएनर्जी प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी प्रतिदिन शहरातून साधारण ४०० टन कचरा उपलब्ध होणे आवश्यक आहे.

उच्च प्रतीच्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, ऊर्जा निर्मितीबरोबरच गॅस निर्मितीही करता येते. उच्च प्रतीचा कचरा मिळण्यासाठी ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण होण्याबरोबच इ-कचरा, घातक कचरा, प्लास्टिक यांचेही वर्गीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने नागरिकांना कचऱ्याच्या बदल्यात मोबदला देण्याची सोय देखील शहरातील चार ठिकाणच्या कचरा केंद्रांवर उपलब्ध करून दिली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी साचला जाणाऱ्या कचऱ्यावर नियंत्रण आणण्यासाठी दंडात्मक कारवाईही केली जाते.

शहर कचरामुक्तीसाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करूनही आजतागायत शहर केवळ ७० टक्के कचरामुक्त झाले आहे. महापालिकेने यापूर्वी कोंडाळामुक्त झोन अभियान राबविले मात्र अगदी काही दिवसांत हे अभियान बंद पडले. शहरात घनकचरा व्यवस्थापनासाठी हायटेक पद्धतीने कचरा उचलला जात असला तरी शहर कचरा कोंडाळामुक्त करण्यासाठी अनेकवेळा अभियान हाती घेण्यात येते.

शॉपिंग मॉल, दवाखाने, बाजारपेठा व अन्य ठिकाणी जाऊन कचऱ्याचे संकलन केले जाते. मात्र काही दिवसांनी पुन्हा तीच परिस्थिती दिसून येते. महापालिकेकडून अधिकतम सुविधा देऊन शहर कचरामुक्तीसाठी प्रशासन पाऊल उचलत आहे.

आकडे बोलतात

शहरात कचरा कोंडाळ्याची एकूण ठिकाणे : ८९०

एकूण घंटागाड्या : १४६

मार्गावरील फेऱ्या : दिवसाआड

दररोज संकलन होणारा कचरा : २५० टन (साधारण)

कचरामुक्त शहराचा हा नवा संकल्प

एकूण घंटागाड्या : १२५

एकूण मार्ग : १९०

मार्गावरील फेऱ्या : दिवसातून दोन वेळा

दररोज संकलन होणारा कचरा : ३०० टन (साधारण)