प्रणिती शिंदेंचे नाव पुढे आल्याने कॉंग्रेसमध्ये चैतन्य

भाजपचे विद्यमान खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जातीच्या दाखल्यावरून देशभर चर्चेत असलेला सोलापूर लोकसभा मतदार संघ आता माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. शिंदे यांनी कन्या आ. प्रणिती यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, याविषयी हायकमांडशी बोलणार आहे, असे सूचक वक्तव्य जाहीरपणे केल्याने हा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Sep 26, 2023 - 17:01
Sep 26, 2023 - 17:02
 0
प्रणिती शिंदेंचे नाव पुढे आल्याने कॉंग्रेसमध्ये चैतन्य

सोलापूर

भाजपचे विद्यमान खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जातीच्या दाखल्यावरून देशभर चर्चेत असलेला सोलापूर लोकसभा मतदार संघ आता माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. शिंदे यांनी कन्या आ. प्रणिती यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, याविषयी हायकमांडशी बोलणार आहे, असे सूचक वक्तव्य जाहीरपणे केल्याने हा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

भाजपने दोनदा सलगपणे मिळवलेला विजय, मुस्लिम मतदार संघाची उल्लेखनीय संख्या, तेलंगणातील भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) मतदार संघावर केलेला फोकस अशा परिस्थितीमध्ये सोलापूर लोकसभा मतदार संघात आ. प्रणिती शिंदे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी याविषयी हायकमांडशी बोलणार, असे जाहीर वक्तव्य माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले आहे. त्यांच्या कन्या तथा आ. प्रणिती या सलग तीनवेळा आमदार म्हणून सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून चढत्या मतांनी निवडून आल्या आहेत. त्यांनी तो मतदारसंघ छानपणे बांधला आहे. अख्ख्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात शिंदे पिता-पुत्रीचा व्यापक जनसंपर्क आहे. त्यामुळे आ. प्रणितींना संधी मिळाल्यास त्या नक्कीच विजय प्राप्त करून सोलापुरात काँग्रेस पक्षाला चैतन्यावस्था प्राप्त करून देतील, असा शिंदेप्रेमींचा व्होरा आहे.

दरम्यान, दुसर्‍या बाजूला भाजपचे विद्यमान खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी थोडेसे बॅकफूटला गेल्याचे जाणवते. पक्षाच्या सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार यंदा पार्टी त्यांच्या ऐवजी काशीच्या जंगमवाडी मठाचे नूतन उत्तराधिकारी म्हणून निवड झालेले बृहन्मठ होटगी मठाचे मठाधिपती धर्मरत्न डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांना संधी देण्याची शक्यता सोलापुरात चर्चेत आहे. त्यातच काही काळापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी डॉ. मल्लिकार्जुन महास्वामींची अक्कलकोट येथील मठात जाऊन भेट घेतली. त्यामुळे या महास्वामींच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे.

दरम्यान, भाजपने सोलापूर लोकसभा समन्वयक म्हणून माजी खा. अमर साबळे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. साबळे यांनी 2019 साली सोलापुरातून लोकसभेची निवडणूक लढविण्याची तयारी केली होती; परंतु तेव्हा त्यांना संधी दिली नाही. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी यंदाही तयारी सुरू केली आहे. साबळे हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघाचे आ. सुभाष देशमुख आणि अक्कलकोटचे आ. तथा भाजप जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांचे निकटवर्तीय मानले जातात.

दुसर्‍या बाजूला, सोलापूर शहर उत्तरचे आ. विजयकुमार देशमुख यांच्या गटाकडून पुण्यातील भाजपचे नेते दिलीप कांबळे यांचे ऐनवेळी पुढे केले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सोलापूर लोकसभा मतदार संघातील जातीच्या गणिताचा अंदाज घेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचेे (आठवले गट) नेते राजाभाऊ सरवदे, वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर किंवा त्यांचे चिरंजीव सुजात या संभाव्य उमेदवारांनी तसेच तेलंगणातील बीआरएस, एमआयएम या राजकीय पार्टीने मतदार संघात जनसंपर्क वाढवण्यास आरंभ केला आहे. असे असले तरी राजकीय पक्ष नेमक्या कोणत्या उमेदवारास संधी देणार, त्या वरिष्ठ नेते प्रचारात नेमका काय मुद्दा चर्चेत आणणार यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून आहेत.

मतदार संघातील ज्वलंत प्रश्न

  • सोलापुरातून विमानसेवा सुरू होण्याचा विषय प्रदीर्घकाळापासून प्रलंबित
  • सोलापूर शहरास तब्बल सहा-सात दिवसांतून एकदाच होणारा पाणीपुरवठा
  • अडचणीत येत असलेल्या यंत्रमाग उद्योगास ऊर्जितावस्था येण्यासाठी पॅकेज हवे
  • पंढरपूर कॅरिडॉरच्या विषयाचा एकदाचा सोक्षमोक्ष लावण्याची गरज

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow