भिडेंच्या विरोधात, समर्थनार्थ सोलापुरात पाच दिवसांपासून राडा
सोलापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी व महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे सोलापुरात गेल्या पाच दिवसांपासून भिडेंच्या विरोधात व समर्थनार्थ राडा सुरू आहे. भिडेंच्या विरोधात काँग्रेस व एमआयएम पक्षांच्या वतीने आंदोलने करून भिडेंना अटकेची मागणी करण्यात आली, तर दुसरीकडे वादग्रस्त व्यक्तव्यामुळे छत्रपती संभाजी महाराज चौकात भिडेंच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक केला.

एखाद्या व्यक्तीने असे बेजबाबदारपणे बोलल्यास त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. यात राजकीय पक्ष, विविध संघटना, धार्मिक संघटना सहभागी होत वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या आणि अशा कारणांमुळे गेल्या पाच दिवसांपासून शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडत चालली आहे. महापुरुषांबद्दल कोणीही अवमानकारक किंवा अपमानकारक वक्तव्य करू नये, मग तो कोणत्याही राजकीय अथवा सामाजिक पक्षाचा नेता असो. आणि जर जाणूनबुजून एखादा नेता जर महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करीत असेल आणि जर त्याच्याबद्दल विधान भवनात आवाज उठत असेल, तर सरकारने महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणार्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक करावी. अशा व्यक्तीवर फक्त गुन्हा दाखल झाला म्हणून त्यांना अटक करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावेत, अशी मागणी होत आहे.