ऋषभला मृत्यूच्या दाढेतून ज्यांनी बाहेर काढलं त्या ड्रायव्हर-कंडक्टरला बक्षीस, स्टार्ट टू एंड घटनाक्रम सांगितला

'आम्ही ऋषभ पंतला बाहेर काढल्यानंतरच्या ५-७ सेकंदातच कारला आग लागली आणि ती जळून खाक झाली. त्याच्या पाठीवर खूप जखमा होत्या. आम्ही त्याला विचारले की तुझं नाव काय? त्यावर मी भारतीय संघातील क्रिकेटर ऋषभ पंत असल्याचं त्याने आम्हाला सांगितलं. आम्ही लगेच दवाखान्याशी संपर्क साधून रुग्णावाहिका उपलब्ध केली आणि ऋषभला दवाखान्यात दाखल केलं, असं ऋषभला मदत करणाऱ्या चालक-वाहकाने सांगितलं.

ऋषभला मृत्यूच्या दाढेतून ज्यांनी बाहेर काढलं त्या ड्रायव्हर-कंडक्टरला बक्षीस, स्टार्ट टू एंड घटनाक्रम सांगितला

नवी दिल्ली : भारताचा धडाकेबाज विस्फोटक फलंदाज ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला अन् संपूर्ण भारतवासियांच्या हृदयाचा ठोका चुकला. डोळ्यावर झोप आलेली असताना कार चालवणं रिषभच्या अपघाताचं कारण ठरलं. दाट धुकं आणि डोळ्यावर आलेली झोप यामुळे रिषभची कार दुभाजकाला धडकली, कित्येक मीटर फरपटत गेली, दरम्यान कारला मोठी आग लागली, यातून ऋषभ थोडक्यात बचावला. त्याने कारच्या समोरील काच फोडून आपली कशीबशी सुटका करुन घेतली. पण त्याला गंभीर दुखापत झाली. त्याचा चेहरा, हात-पाय, गुडघे आणि पाठीला गंभीर इजा झालेली आहे. डॉक्टर त्याच्यावर उपचार करतायेत. दरम्यान, अपघातस्थळी एका बसच्या चालक आणि वाहकाच्या समयसूचकतेमुळे ऋषभचे प्राण वाचले. त्यांनीच ऋषभला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोहोचवलं. चालक आणि वाहकाच्या प्रशंसनीय कामाबद्दल दोघांचाही सन्मान करण्यात आलाय. सुशील कुमार आणि परमजीत यांचा पानिपत डेपोकडून बक्षीस मिळालंय. हरियाणा सरकारने देखील दोघांचा सन्मान करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. अपघाताची तीव्रता ओळखून, समसूचकता दाखवून चालक-वाहकाने ऋषभला मदत केली, मानवतेसाठी त्यांचं काम प्रशंसनीय आहे, त्यांचा जरुर सन्मान करायला हवा, असं हरियाणा सरकारने म्हटलं. 'आम्ही ऋषभ पंतला बाहेर काढल्यानंतरच्या ५-७ सेकंदातच कारला आग लागली आणि ती जळून खाक झाली. त्याच्या पाठीवर खूप जखमा होत्या. आम्ही त्याला विचारले की तुझं नाव काय? त्यावर मी भारतीय संघातील क्रिकेटर ऋषभ पंत असल्याचं त्याने आम्हाला सांगितलं. आम्ही लगेच दवाखान्याशी संपर्क साधून रुग्णावाहिका उपलब्ध केली आणि ऋषभला दवाखान्यात दाखल केलं. जर ऋषभला कारबाहेर काढण्यास ५-७ सेकंद उशीर झाला असता तर काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती, अशी भीतीही वाहक परमजीतने बोलून दाखवली. ऋषभवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं काय? ऋषभ पंतच्या मस्तकाला आणि गुडघ्याला जबर मार लागला आहे. त्याचमुळे त्याच्या ब्रेन आणि स्पाईनचं MRI स्कॅन करण्यात आला. 'पंतला कुठेही फ्रॅक्चर झालेले नाही. मात्र, गुडघ्याच्या लिगामेंटला दुखापत झाली असून, अनेक ठिकाणी त्याला जखमा झाल्या आहेत. हॉस्पिटलमध्ये आणले, तेव्हा तो पूर्ण शुद्धीवर होता. त्याने माझ्याशी संवादही साधला. त्याच्या कपाळातून रक्त निघत होते. भाजल्याच्या थोड्या खुणा होत्या. मात्र, मी त्याला टाके घातले नाहीत. पुढील उपचारांसाठी मी त्याला मॅक्स हॉस्पिटलमध्ये पाठविले. आम्ही त्याचे लगेच एक्स रे काढले होते. त्यात त्याला हाडाला दुखापत झाली नसल्याचे दिसले. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला दोन ते सहा महिन्यांचा कालावधी लागेल,' असे पंतवर उपचार करणारे डॉ. सुशील नागर यांनी सांगितले.