समीर वानखेडे RSS च्या मुख्यालयात, रेशीमबागेत मोहन भागवतांची भेट, भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण
Speculation Sameer Wankhede Join BJP: एनसीबीचे संचालक असताना शाहरुख खानच्या मुलाला अटक करणारे समीर वानखेडे प्रचंड चर्चेत आले होते. मात्र, त्याची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती.

मुंबई: अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या मुंबई विभागाचे माजी संचालक हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जोर धरला आहे. समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी रविवारी नागपूरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचीही भेट घेतली होती. संघाच्या मुख्यालयात समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांनी केशव हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधीवर जाऊन फुलं वाहिली आणि हात जोडले होते. त्यामुळे समीर वानखेडे आता भाजपमध्ये जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.ठाकरे सरकारच्या काळात समीर वानखेडे यांनी अमलीपदार्थ प्रतिबंधक कक्ष अर्थात एनसीबीच्या माध्यमातून ड्रग्ज तस्कर आणि बॉलीवूड इंडस्ट्रीला हादरवून सोडले होते. त्यांच्याच कार्यकाळात ड्रग्ज सेवन करणाऱ्या अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींची एनसीबीकडून चौकशी झाली होती. करोना काळात वानखेडे यांची ड्रग्ज प्रकरणात अनेक धाडी टाकून आपला दरारा निर्माण केला होता. कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीत वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने बॉलीवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्यावर समीर वानखेडे लाईमलाईटमध्ये आले होते. ड्रग्ज सेवन प्रकरणात आर्यन खानला अनेक दिवस तुरुंगात राहावे लागले होते. मात्र, या एकूणच कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. समीर वानखेडे यांनी आर्यन खानला याप्रकरणात जाणीवपूर्व गोवले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला होता. नवाब मलिक यांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या होत्या. ड्रग्ज सेवन प्रकरणात आर्यन खानला करण्यात आलेली अटक म्हणजे एक कट असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे समीर वानखेडे यांना मोठ्या नामुष्कीचा सामना करावा लागला होता. तसेच याच काळात समीर वानखेडे यांच्या नवी मुंबईतील अवैधरित्या मिळवलेल्या बार परवान्याचे प्रकरणही उजेडात आले होते. या सगळ्यामुळे वानखेडे यांची एनसीबीच्या विभागीय संचालकपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती.