सोलापूर : दागिन्यांचे चोरटेे सापडतात; घेणारे राहतात ‘सेफ’

सोलापूर : चोरलेले दागिने चोरटे काही दिवसांनंतर सराफाला कमी किमतीत विकतात. याची पोलिसांना खबरही मिळते. चोरटे जाळ्यात सापडतात. मात्र, दागिने घेणारे सराफ अथवा खासगी सावकार पोलिसांच्या हाती का लागत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. जोपर्यंत दागिने घेणार्‍यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत दागिने चोरीची मालिका थांबणार नाही.

सोलापूर : दागिन्यांचे चोरटेे सापडतात; घेणारे राहतात ‘सेफ’

सोलापूर : चोरलेले दागिने चोरटे काही दिवसांनंतर सराफाला कमी किमतीत विकतात. याची पोलिसांना खबरही मिळते. चोरटे जाळ्यात सापडतात. मात्र, दागिने घेणारे सराफ अथवा खासगी सावकार पोलिसांच्या हाती का लागत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. जोपर्यंत दागिने घेणार्‍यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत दागिने चोरीची मालिका थांबणार नाही.

एस.टी. बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या हातातील पर्स चोरणे किंवा कुलूपबंद घरावर लक्ष ठेऊन दागिने लंपास केले जातात. सध्या सोलापुरात कुलूपबंद घरे चोरट्यांच्या रडारवर असल्याचे दिसून येते. बंद घर फोडल्यानंतर पोलिस ठाण्यात चोरीची किंवा घरफोडीची फिर्याद दाखल होते. त्यानंतर पोलिसांचा तपास सुरू होतो. चोरी केल्यानंतर लगेचच चोरटे दागिने विकण्यासाठी सराफाकडे जात नाहीत. चोरटे आणि सराफ यांचे साटेलोटे असते. चोरटा पोलिसांना सापडला तरी संबंधित चोरीचे सोने घेणार्‍या सराफाचे नाव सांगत नाही. चोरीचे सोने घेणारा सराफही चोरट्याचे नाव सांगत नाही. क्वचित एखाद्या गुन्ह्यात सराफाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे दिसून येते.

चोरीचे सोने विकण्यासाठी सराफ बाजाराकडे जाताना चोरट्यास पकडले, अशी माहिती पोलिसांकडून माध्यमांना दिली जाते. मात्र, तो चोरटा कोणत्या सराफाकडे सोने विकण्यास जात होता, हे नाव मात्र गुलदस्त्यात ठेवले जाते. चोरटा आणि सराफाचे साटे-लोटे उघड होऊनही पोलिस सराफाविरुद्ध गुन्हा दाखल का करीत नाही, हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहेे. जोपर्यंत सराफाविरुद्ध गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत चोर्‍या व घरफोडीचे गुन्हे कमी होणार नाहीत, असे एका सेवानिवृत्त पोलिस अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. चोरी, घरफोडी, दरोडा, चेन स्नॅचिंग अशा प्रकारचे गुन्हे केवळ शहरातच नाही, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही घडताना दिसतात. अशा घटनांमध्ये चोर हाती लागले तरी लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जातात कोठे, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

पोलिसांची कारवाई संशयास्पद

पोलिसांनी जर चोरीचा आरोपी सापडला, तर तो दागिन्याचे काय करतो याचा तपासही होत असणार. या तपासात नावेही कळत असतील. असे असेल तर दागिने घेणार्‍यांवर कारवाई का होत नसेल, ही बाब शंकास्पदच आहे. चोरीचे दागिने विकत घेणार्‍या सराफांविरुद्ध जोपर्यंत गुन्हे दाखल करून त्यांना अटक होत नाही तोपर्यंत चोर्‍या, घरफोड्या यांचे प्रमाण हे चालूच राहणार, हे मात्र निश्चित.