नवी दिल्ली: तुम्ही पॅन आणि आधार कार्ड वापरत असाल आणि तुम्ही अजूनही तुमचा पॅन नंबर आधारशी लिंक केला नसेल, तर वेळ वाया न घालवता लगेचच ते करून घ्या नाहीतर १ एप्रिलपासून तुमचा पॅन नंबर निष्क्रिय होईल. इन्कम टॅक्स विभागाने देखील करदात्यांसाठी नोटीस जारी केली आहे. यानुसार आयकर विभागाने ३१ मार्च २०२३ पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. आत्तापर्यंत बहुतांश पॅन कार्डधारकांनी आपले पॅन आधारशी लिंक केले आहे, पण अजूनही असे अनेक लोक आहेत ज्यांनी अद्यापही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.मंगळवार, १७ जानेवारी २०२३ रोजी आयकर विभागाने ट्विटद्वारे याची माहिती दिली. आयकर विभागाच्या ट्विटनुसार “आयकर कायदा, १९६१ नुसार, सर्व पॅन धारक जे सूट मिळालेल्या श्रेणीत येत नाहीत त्यांनी ३१.०३.२०२३ पूर्वी त्यांचे पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. १.०४.२०२३ पासून अनलिंक केलेलं पॅन कार्ड निष्क्रिय होईल. खूप उशीर होण्यापूर्वी लिंक करा. उशीर करू नका, आजच लिंक करा!”लक्षात घ्या की पॅन कार्डशिवाय आयकर विभागाचे कोणतेही काम पूर्ण होत नाही. आयकर विभागाला तुमच्या पॅन कार्ड नंबरवरून तुमच्या आर्थिक स्थितीची माहिती मिळते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे पॅन कार्ड त्वरित लिंक करून घ्या. तुम्ही तुमचे पॅन कार्ड तुमच्या मोबाईलशी कसे लिंक करू शकता, ते खालीलप्रमाणे जाणून घेऊया... पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास अडचणीत याला३१ मार्च २०२३ पूर्वी पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न (प्राप्तिकर रिटर्न) फाईल करू शकणार नाही. त्याच वेळी, ३१ मार्चपर्यंत भौतिक शेअर्सचे डीमॅट स्वरूपात रूपांतर करणे देखील गरजेचे आहे. याशिवाय आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवण्यासाठी देखील पॅन कार्डचा वापर केला जातो. या क्रमांकावरून सरकारला लोकांच्या कराची माहिती मिळते. पॅनकार्ड नंबरवरून आयकर विभाग आर्थिक व्यवहारांच्या नोंदी ठेवतो. हे पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक प्रणाली अंतर्गत केले जाते.तसेच देशातील कोणतीही व्यक्ती किंवा कंपनीची माहिती एकाच पॅन क्रमांकावर नोंदवली जाते. लक्षात घ्या की जर एखाद्याने दोन किंवा त्याहून अधिक पॅन कार्ड बनवले असले तरी त्याला सहजासहजी पकडता येत नाही. म्हणूनच पॅन कार्ड आधारशी लिंक केले जात आहे, कारण फक्त एक पॅन कार्ड नंबरच आधारशी लिंक करता येईल. अशा परिस्थितीत जर कोणाकडे एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असतील तर ते आपोआप निष्क्रिय होतील.पॅन कार्ड आधारशी लिंक कसे करणारपॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी तुम्ही आयकरच्या ई-फायलिंग पोर्टलला भेट द्यावी. येथे एक फॉर्म ओपन होईल, ज्यात तुम्हाला तुमचा आधार आणि पॅन कार्ड नंबर भरावा लागेल. यानंतर तुम्ही तुमची सर्व माहिती आधार कार्डनुसार भरावी. अखेरीस कॅप्चा कोड भरून फॉर्म सत्यापित केल्यावर तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले जाईल. हे काम तुम्ही अगदी सहज घरी बसून करू शकता.