बाजार अस्थिर! सेन्सेक्स, निफ्टी सपाट, IT मध्ये विक्रीचा दबाव

पुढारी ऑनलाईन : आशियाई बाजारातून कमकुवत संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय बाजारात अस्थिर परिस्थिती दिसून आली. सेन्सेक्स आज ७८ अंकांच्या घसरणीसह ६५,९४५ वर बंद झाला. तर निफ्टी १९,६६४ वर स्थिरावला. क्षेत्रीय पातळीवर बँकिंग आणि आयटी वगळता एफएमसीजी निर्देशांक ०.५ टक्क्यांनी वाढून बंद झाला.

Sep 26, 2023 - 17:23
Sep 26, 2023 - 17:24
 0
बाजार अस्थिर! सेन्सेक्स, निफ्टी सपाट, IT मध्ये विक्रीचा दबाव

आशियाई बाजारातून कमकुवत संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय बाजारात अस्थिर परिस्थिती दिसून आली. सेन्सेक्स आज ७८ अंकांच्या घसरणीसह ६५,९४५ वर बंद झाला. तर निफ्टी १९,६६४ वर स्थिरावला. क्षेत्रीय पातळीवर बँकिंग आणि आयटी वगळता एफएमसीजी निर्देशांक ०.५ टक्क्यांनी वाढून बंद झाला. इतर सर्व निर्देशांकही हिरव्या चिन्हात बंद झाले. बीएसई मिडकॅप निर्देशांक सपाट पातळीवर राहिला. तर स्मॉलकॅप निर्देशांकात ०.३ टक्के वाढ झाली. आज बँकिंग आणि आयटी क्षेत्रात विक्री तर मेटल, मीडिया आणि ऑटो क्षेत्रात खरेदी राहिली. (Share Market Closing Bell)

कोणते शेअर्स घसरले, कोणते वधारले

सेन्सेक्स (Sensex Today) आज ६६,०७१ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६५,८६५ अंकांपर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, कोटक बँक, एशियन पेंट्स हे शेअर्स सुमारे १ टक्क्यांनी घसरले. इन्फोसिस, टायटन, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, पॉवर ग्रिड, विप्रो, मारुती, टीसीएस हे शेअर्सही घसरले. तर टाटा स्टील, नेस्ले इंडिया, एलटी, एनटीपीसी, बजाज फायनान्स, एम अँड एम, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक हे शेअर्स तेजीत राहिले.

निफ्टी ५० वर आयशर मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, नेस्ले इंडिया, बजाजऑटो, टाटा स्टील हे टॉप गेनर्स राहिले. हे शेअर्स १ ते २.५० टक्क्यांपर्यंत वाढले. तर इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, सिप्ला, कोटक बँक, एशियन पेंट्स हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले.

डेल्टा कॉर्प शेअर दोन दिवसांत २३ टक्क्यांहून अधिक घसरला

डेल्टा कॉर्पचे शेअर्स (Delta Corp shares) मंगळवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात एनएसई (NSE) वर सुमारे ६ टक्क्यांनी घसरून त्यांच्या ५२ आठवड्यांच्या निचांकी १३५ रुपयांवर गेले. डेल्टा कंपनीला जुलै २०१७ ते मार्च २०२२ या कालावधीसाठी व्याज आणि दंडासह १११.४ अब्ज रुपयांचा कर भरण्याची नोटीस सरकारकडून शुक्रवारी आल्यानंतर गेल्या दोन सत्रांमध्ये हा शेअर २३ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. (Share Market Closing Bell)

आशियासह युरोपीय बाजारात घसरण

अमेरिकेतील संभाव्य शटडाउन आणि चिनी अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळे आशियाई बाजारात आज घसरण दिसून आली. जपानचा निक्केई निर्देशांक १.११ टक्क्यांनी घसरून ३२,३१५ वर आला. हाँगकाँगचा हँग सेंग, चीनचा शांघाय कंपोझिट हेही घसरले. वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदरात (US interest rate) आणखी वाढ करण्याची शक्यता आहे. या चिंतेने युरोपीय शेअर बाजार (European stock markets) मंगळवारी घसरणीसह खुले झाले. ब्लू-चिप कंपन्यांचा लंडनचा FTSE 100 निर्देशांक (London’s benchmark FTSE 100 index) सोमवारच्या बंद पातळीपासून ०.३ टक्क्यांनी घसरून ७,६०० अंकांवर आला. युरोझोनमध्ये फ्रँकफर्टचा DAX निर्देशांक ०.६ टक्क्यांनी खाली येऊन १५,३०८ वर स्थिरावला. पॅरिस सीएसी ४० (Paris CAC 40) हा ०.९ टक्क्यांनी घसरून ७,०६२ वर आला.

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री

एनएसईवरील उपलब्ध आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) २५ सप्टेंबर रोजी २,३३३.०३ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) १,५७९.२८ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. या महिन्यात २५ सप्टेंबरपर्यंत FII ने २०,५९४.४२ कोटी रुपयांचे शेअर्स विकले तर DII ने १३,७४८.६५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow