'राज्यपाल चले जाव'च्या घोषणांनी सोलापूर शहर दणाणले; सर्वपक्षीय नेत्यांचा विराट मोर्चा

सोलापूर शहरात आज महामानवाबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी बंद पुकारण्यात आला होता. या बंदमध्ये भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

'राज्यपाल चले जाव'च्या घोषणांनी सोलापूर शहर दणाणले; सर्वपक्षीय नेत्यांचा विराट मोर्चा

सोलापूर: महामानवाबद्दल अवमानकारक शब्द बोलल्याप्रकरणी सोलापूरमध्ये संतापाची लाट शुक्रवारी १६ डिसेंबर रोजी पहायला मिळाली. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक यादरम्यान भव्य मोर्चा काढण्यात आला होता.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे कार्यकर्ते व पदाधिकारी, बहुजन समाजातील व दलित वर्गातील सामाजिक कार्यकर्ते,नेते आदींनी भव्य मोर्चा काढला होता. राज्यपाल भगतसिंग कोशारी, राज्य सरकारमधील भाजपा मंत्री चंद्रकांत पाटील, सुद्धांशु त्रिवेदी यान नेत्यांची हकालपट्टी करा अशी प्रमुख मागणी करत, जोरजोरात घोषणाबाजी करत विराट मोर्चा काढण्यात आला.

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने विराट मोर्चा काढला होता. दोन किलोमीटरपर्यंत मोर्चेकरी हातात भगवे झेंडे घेऊन दिसत होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते सोलापूर बस स्थानक या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे वळविण्यात आली होती. शुक्रवारी १६ डिसेंबर रोजी बंद असल्याची माहिती आठवडा भरापासून सोलापूरकरांना मिळाली होती, त्यामुळे तुरळकच नागरिक रस्त्यावर उपस्थित होते. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवले होते.

शहर दणाणले

सोलापूर शहरात सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गर्दी जमण्यास सुरुवात झाली. राज्यपाल भगतसिंग कोशारी, चंद्रकांत पाटील, सुधांशु त्रिवेदी आदी नेत्यांविरोधात संताप व्यक्त केला जात होता. पोलिसांनी दुपारी दोन वाजेपर्यंत बंदची परवानगी दिल्याने १२ वाजण्याच्या सुमारास भव्य मोर्चा काढण्यात आला. सोलापूर शहरात राज्यपाल भगतसिंग कोशारी,नामदार चंद्रकांत पाटील,सुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत शहर परिसर दणाणले होते.