'जाऊबाई जोरात'; सरपंचपदासाठी एकाच कुटुंबातील दोन जावा; मतदारांसमोर वेगळाच पेच
भंडारा तालुक्याच्या दीघोरी (आमगांव) या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत एका कुटुंबातील दोन भावांच्या पत्नी म्हणजेच जाऊ-जाऊ मध्ये होणारा कौटुंबिक वाद आता ग्रामपंचायत निवडणुकीतही पाहायला मिळत आहे.

भंडारा : निवडणुका म्हटलं तर नव नवीन प्रयोग बघायला मिळतात. त्यात ग्रामपंचायतची निवडणूक म्हटलं की कुटुंबातच राजकारण कधी सुरु होईल सांगता येत नाही. असच काहीसं उदाहरण बघायला मिळत आहे ते भंडारा तालुक्याच्या दीघोरी (आमगांव) या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत. या गावातील एका कुटुंबातील दोन भावांच्या पत्नी म्हणजेच जाऊ-जाऊ मध्ये होणारा कौटुंबिक वाद आता ग्रामपंचायत निवडणुकीतही पाहायला मिळत आहे.
भंडारा जिल्ह्यात येत्या १८ डिसेंबरला म्हणजे उद्या होणार असलेल्या ३०८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तालुक्याच्या दीघोरी (आमगाव) या ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. या ग्रामपंचायतीमध्ये भावकीत निवडणुकीचा रणसंग्राम रंगला आहे. या गावातील नागदेवे कुटुंबातील दोन जावा सरपंच पदासाठी निवडणूक लढवत आहेत. मोठी जाऊ वीणा नागदेवे या आपल्या पॅनलकडून सरपंच पदासाठी लढत आहेत. तर त्यांच्या छोट्या जाऊ पायल नागदेवे अपक्ष म्हणून सरपंच पदासाठी निवडणूक लढवत आहेत.
दोन्ही जावा म्हणतात की निवडणुकीत कोणीही जिंकून आल्यावर परिवारात तडा जाणार नाही. मात्र, असं म्हणत असले तरीही एकमेकांच्या विरुद्ध प्रचारकरता जोर लावण्यात कोणीही मागे हटायला तयार नाहीय.