News Image

डॉ. बाबासाहेबांना अनुयायांचे अभिवादन:विविध धार्मिक कार्यक्रम, भीम अनुयायांच्या गर्दीने फुलला इर्विन चौक


प्रतिनिधी अमरावती भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित व अन्यायाला बळी पडलेल्यांचा उद्धार केला, त्यामुळेच सोमवारी, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (इर्विन) चौकातील विश्वरत्नांच्या पुतळ्याला हजारोंच्या संख्येतील अनुयायांनी उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, अशी आदरभावना व्यक्त करत अभिवादन केले. शहरासह जिल्ह्यात उत्साह, आनंद, सलोख्याच्या वातावरणात १३४ व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भीमटेकडी, बडनेरा येथे मोठ्या संख्येत अनुयायांनी महामानवांची जयंती साजरी केली. सर्वत्र भीम गीतं, निळे पंचशील ध्वज दृष्टीस पडत होते. हे परिसर रात्री १२ वाजता पासूनच अनुयायांच्या गर्दीने फुलले होते. इर्विन चौकात पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी रविवारी रात्री पासूनच मोठी गर्दी उसळली होती. यावेळी विविध प्रकारचे पुस्तक विक्री तसेच मूर्ती विक्रीची दुकाने सजली होती. पुस्तकांचे स्टॉल्स, हार, पूजेचे साहित्य, आपल्या मुक्तीदात्याला अभिवादन करण्यासाठी शिस्तबद्ध लागलेल्या लांबच लांब रांगा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होत्या. भीम अनुयायांपासून ते सर्व धर्मीय नागरिक, सर्व राजकीय नेते, पदाधिकारी, शासकीय अधिकारीही येथील कार्यक्रमाला उपस्थित होते. विविध सामाजिक संघटना तसेच कार्यकर्त्यांनी अभिवादनासाठी यादरम्यान आलेल्या नागरिकांसाठी थंड पाणी, सरबत, अल्पोपहार, खिचडी वाटप, पुरी, बटाट्याची भाजी, बुंदीचे लाडू वितरित केले. विविध वस्तूंची दुकाने, भीम व बुद्ध गीतांचा कार्यक्रम, खाद्य पदार्थांचे स्टॉल्स यामुळे संपूर्ण परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. आली जयंती जयंती भीमा माऊलीचा सण.. या सारख्या गीतांवर तरुणाईचा जल्लोष पहायला मिळाला. १३४ किलो पेढ्यांचे वाटप : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांना विश्वरत्नांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सायं. ६ वाजता १३४ किलो पेढ्यांचे रुग्ण सेवक नितीन काळे यांनी वाटप केले. मागील १० वर्षांपासून ते दरवर्षी याच दिवशी पेढे वाटप करत आहेत. मसाले भात, बुंदीचे लाडू, पुरी-भाजीचे केले वाटप सामाजिक संघटना, राजकीय पक्षांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील अनुयायांना मसाले भात, बुंदीचे लाडू, पुरी-भाजी, खिचडी, सरबत, ताक, पिण्याचे पाणी वितरित करण्यात आले. २ क्विंटल तांदळाचा मसाले भात, १३४ किलो बुंदीचे लाडू, हजारो अनुयायांना पुरी-बटाट्याची भाजी, खिचडीचे वाटप करण्यात आले.