
आयएएस अधिकाऱ्यांची खांदेपालट सुरूच:आता पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या, आस्तिक कुमार पांडे MMRDA चे नवे सहआयुक्त
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून वरिष्ठ पातळीवरील प्रशासनात खांदेपालट सुरू झाला. राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच आहे. या आधी 1 एप्रिल रोजी 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आताही पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या बदल्यांचे आदेश आज जारी करण्यात आलेत. आयएएस अधिकारी आस्तिक कुमार पांडे यांची एमएमआरडीएच्या सहआयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. तर आर. एस. चव्हाण यांची कर्मचारी राज्य विमा योजनेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली. कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली? 1. अस्तिक कुमार पांडे (IAS:RR:2011)- आयुक्त, कर्मचारी राज्य विमा योजना, मुंबई यांची MMRDA, मुंबई सहआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2. आर.एस.चव्हाण (IAS:SCS:2013)- यांची नियुक्ती आयुक्त, कर्मचारी राज्य विमा योजना, मुंबई म्हणून करण्यात आली आहे. 3. राहुल गुप्ता (IAS:RR:2017) सह व्यवस्थापकीय संचालक, MAHADISCOM, छत्रपती संभाजी नगर यांची जिल्हाधिकारी, हिंगोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 4. सत्यम गांधी (IAS:RR:2021) प्रकल्प अधिकारी, ITDP, डहाणू आणि सहायक जिल्हाधिकारी, डहाणू उपविभाग, पालघर यांची महापालिका आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 5. विशाल खत्री (IAS:RR:2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, राळेगाव उपविभाग, यवतमाळ यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, डहाणू आणि सहायक जिल्हाधिकारी, डहाणू उपविभाग, पालघर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या आधी 1 एप्रिल रोजी कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या? 1. इंदुराणी जाखर - पालघर जिल्हाधिकारी 2. नेहा भोसले - रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी 3. भारत बास्टेवाड - रोजगार हमी योजना, नागपूर 4. राजेंद्र भारूड - अतिरिक्त विकास आयुक्त, उद्योग 5. लक्ष्मी नारायण मिश्रा - जॉईन्ट एमडी, एमएसआरडीसी 6. निधी पांडे - व्यवस्थापक संचालक, लघुउद्योग 7. वैष्णवी बी - अतिरिक्त आयुक्त, नागपूर मनपा