News Image

ऐनवेळी भाषण रद्द, अजितदादांचा मोठा निर्णय:म्हणाले - मी आणि एकनाथरावांनी ठरवले, कितीही घाई असली तरी दोन मिनिटे भाषण करायचे


भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नियोजित भाषण ऐनवेळेला रद्द करण्यात आले. रायगडावर देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांना भाषणाची संधी देण्यात आली नव्हती. या दोन्ही घटनांमुळे मोठी चर्चा रंगली आहे. यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. इथून पुढे कितीही घाईगडबत असली, तरी दोन मिनिटे भाषण करायचेच, असे मी आणि एकनाथरावांनी ठरवले असल्याचे अजित पवार म्हणाले. दादरमधील चैत्यभूमीवर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांआधी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे भाषण होणार होते. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे भाषण होणार असल्याचे लिहिण्यात आले होते. मात्र, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे भाषण झाल्यानंतरही दोघांना भाषणाची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे दोन्ही मुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेमके काय म्हणाले अजित पवार? अजित पवार म्हणाले की, मी आणि एकनाथरावांनी ठरवले आहे की इथून पुढे कितीही घाईगडबड असली तरीही दोन-दोन मिनिटे भाषण करायचंच. जेणेकरून परत असा मुद्दा उपस्थित होणार नाही. वेळेचे गणित बसवून निर्णय घेतला जातो. परवा राज्यपाल बोलले, मुख्यमंत्री बोलले तो कार्यक्रम संपला. आम्हाला आश्चर्य वाटते की आमच्याकडे एवढे लक्ष आहे. इथून पुढे कोणताही कार्यक्रम असला तरीही आम्ही थोडेसे तिथे बोलणार आहोत. रायगडावरही अजित पवारांना भाषणाची संधी नाही दरम्यान, रायगडावर दिनांक 12 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यातिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमात अनेकांची भाषणे झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऐनवेळी भाषणाची संधी दिली. पण अजित पवार यांना भाषणाची संधी मिळाली नाही. त्यामुळे अजित पवारांना डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. यावरही अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने पुढे कसे गेले पाहिजे, यासंदर्भाने रायगडावर चर्चा झाली. तसेच रायगडावर सर्वांनी भाषणे केली. पण वेळ कमी होता, त्यामुळे मी काही भाषण केले नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाह यांनी भाषण केले, असे अजित पवार म्हणाले होते.