News Image

हिंगोलीचे नवीन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची नियुक्ती:बुधवारी पदभार स्वीकारणार, पाणी प्रश्नासह आरोग्य सेवा बळकट करण्याचे आव्हान


हिंगोलीचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील वीज कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी ता. १५ काढले आहेत. हिंगोलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची सात महिन्यातच बदली झाल्यानंतर नवीन जिल्हाधिकारी कोण येणार याची उत्सुकता नागरिकांना लागली होती. जिल्हाधिकारी गोयल यांनी सात महिन्यातच जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न केले होते. या शिवाय शिक्षण, आरोग्य क्षेत्रातही मोठे काम केले. त्यांच्या बदलीमुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत होता. तर काही ठिकाणी आंदोलनाची तयारीही चालविली होती. दरम्यान, गोयल यांची बदली झाल्यानंतर नवीन जिल्हाधिकारी कोण येणार याची उत्सुकता नागरिकांना लागली होती. त्यानंतर आज नुतन जिल्हाधिकारी म्हणून वीज कंपनीचे छत्रपती संभाजीनगर येथील सह व्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी गुप्ता हे इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून सन २०१७ मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळविले आहे. त्यानंतर त्यांनी गडचिरोली जिल्हयातील अहेरी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले असून त्यानंतर धाराशिव जिल्हा परिषदेचे तीन वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते वीज कंपनीचे सह व्यवस्थापकीय संचालक आहेत. आता त्यांची हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून ही त्यांची जिल्हाधिकारी म्हणून पहिलीच पद स्थापन आहे. हिंगोली जिल्ह्यातील पाणी प्रश्नासोबत आरोग्य सेवा बळकट करणे, शैक्षणिक दर्जा उंचावणे यासह विकासकामांचे आव्हान त्यांच्या समोर आहे. जिल्हाधिकारी गुप्ता हे बुधवारी ता. १६ पदभार स्वीकारणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.