
दगडूशेठ गणपती ट्रस्टची मोठी कामगिरी:'आरोग्य गणेशा' अंतर्गत एका वर्षात 72 हजारांहून अधिक रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगीकारून जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत 'आरोग्य गणेशा' मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे २०२४-२५ आर्थिक वर्षात मोठे योगदान देण्यात आले आहे. यामध्ये वर्षभरात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, तपासण्या, साहित्य व औषधे वाटप अशी विविध प्रकारची सर्वतोपरी मदत तब्बल ७२ हजार ४८३ रुग्णांना करण्यात आली आहे. मागील वर्षी २०२३-२४ या वर्षात ४१ हजार ८७७ रुग्णांना मदत करण्यात आली होती, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, पदाधिकारी यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने म्हणाले की, जनतेच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात ट्रस्टचे काम सुरू आहे. ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य विभाग सुरू करण्यात आला असून रुग्णांना सर्वतोपरी मदत होईल असा प्रयत्न करण्यात येतो. ट्रस्टची रुग्णवाहिका सेवा देखील सातत्याने सुरू आहे. ट्रस्टच्या माध्यमातून ससून येथे रुग्ण व नातेवाईकांना भोजन देखील मोफत दिले जाते. महेश सूर्यवंशी म्हणाले, महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व पुणे महानगरपालिकेच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, हे अनेक रुग्णांना माहीत नसते. त्या रुग्णांना ट्रस्टतर्फे योजनांचा लाभ करून दिला जातो. तसेच, ज्या रुग्णांकडे अपुरी कागदपत्रे असतील, त्यांना नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून कागदपत्रे मिळवून देण्याकरिता देखील ट्रस्ट सदैव तत्परतेने कार्य करीत आहे. वर्षभरात ट्रस्टशी संलग्न विविध २२३ रुग्णालय आणि विविध संस्थांमधून ही सेवा दिली जात आहे. जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांना मोफत आरोग्य शिबीर व विविध शाळांमध्ये आरोग्य शिबिराच्या माध्यमातून देखील ही सेवा दिली जाते.