
अमरावतीच्या 6 खेळाडूंना प्रतिष्ठेचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार:सर्वेश मेन, जितेश शर्मा, सांजली वानखडे, विपुल घुरडे, यशदीप भोगे, मंजिरी अलोने पुरस्काराचे मानकरी
अमरावतीच्या सहा खेळाडूंनी यंदा राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार पटकावला आहे. वीर अभिमन्यू क्रीडा मंडळ, पन्नालाल नगरचा राष्ट्रीय आट्यापाट्या खेळाडू सर्वेश मेनला वर्ष २०२२-२३ साठी तसेच एचव्हीपीएम क्रिकेट स्टेडियमवर घडलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्माला २०२३-२४ साठी थेट पुरस्कार देण्यात आला आहे. याच वर्षासाठी एचव्हीपीएमची राष्ट्रीय जलतरणपटू, वॉटर पोलो खेळाडू सांजली वानखडे, राष्ट्रीय रोइंग खेळाडू विपुल घुरडे, आंतरराष्ट्रीय धनुर्धर यशदीप भोगे, एकलव्य धनुर्विद्या अकादमी नांदगाव खंडेश्वरची आंतरराष्ट्रीय धनुर्धर मंजिरी अलोने यांनाही मंगळवार, १५ एप्रिलला दुपारी राज्यातील मानाचा क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्व सहाही खेळाडूंना शुक्रवार, १८ एप्रिलला पुण्यातील बालेवाडी-म्हाळुंगे येथे असलेल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये सकाळी ११ ते २.३० या वेळेत आयोजित समारंभात राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, क्रीडा मंत्र्यांच्या उपस्थितीत शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने गौरवले जाणार आहे. सांजली वानखडे पुरस्कार प्राप्त सहाही खेळाडूंनी अथक परिश्रमाद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजवल्या आहेत. धनुर्धर यशदीप भोगे, मंजिरी अलोने, सांजली वानखडे, सर्वेश मेन, जितेश शर्मा आणि रोइंग (नौकायन) विपुल घुरडेनेही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक पटकावले आहे. सर्व खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात विशेष ओळख निर्माण केली असून, त्यामुळेच त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. सध्या आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू असून जितेश शर्मा खेळण्यात व्यस्त आहे. तो आरसीबीकडून यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळत आहे. त्यामुळे त्याला या पुरस्कार वितरण समारंभाला उपस्थित राहता येणार नाही. त्याच्या ऐवजी हा पुरस्कार त्याची पत्नी शलाका जितेश शर्मा व जितेशचे प्रशिक्षक डॉ. दीनानाथ नवाथे स्वीकारतील. हे दोघेही १७ एप्रिलला सायंकाळी पुण्याकडे रवाना होणार आहेत. या पुरस्कारामुळे अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण मंगळवारी दुपारी २ वाजता शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा झाली. जिल्ह्यातील सहा खेळाडूंना एकाचवेळी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल संपूर्ण जिल्ह्यातच आनंदाची लाट पसरली. सर्व खेळाडूंना ब्लेझरसह समारंभाला उपस्थित राहायचे असल्याने शासनाकडून ब्लेझर शिवण्याचा खर्च, एसी थ्री टायर प्रवास भत्ता, दैनिक भत्ता दिला जाणार आहे. तसेच पुरस्कार विजेत्यासोबत १० जणांना प्रवेश दिला जाणार आहे.