
कोरोना आपल्यासोबतच राहणार:लोकांना पॅनिक होऊन देऊ नका, आरोग्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना; आज 105 नवीन रुग्णांची नोंद
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी महाराष्ट्रात १०५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ३ नवीन बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच राज्यातील सक्रिय कोविडबाधित रुग्णांची संख्या ५२६ वर पोहोचली आहे. वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. कोरोना आपल्यासोबतच राहणार, लोकांना पॅनिक होऊ देऊ नका, अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी केल्या आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या असलेला जिल्हा पुणे आहे, याठिकाणी ४१ सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर मुंबई (३२), ठाणे (१५), नवी मुंबई (९), सातारा (५) आणि नाशिक, संभाजीनगर आणि नागपूर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. काय म्हणाले आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर? आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी वाढत्या कोरोना रुग्णसंखेवर प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंखेत वाढ होत असली तरी जनतेने घाबरून जाऊ नये असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या आधी देखील सांगितला आहे, कोरोना वाढला तरी काळजीची गरज नाही. कोरोना आपल्या सोबतच राहणार आहे. आता आपली प्रतिकारशक्ती ही वाढली आहे. रुग्ण वाढत असले तरी केवळ कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही. सहव्याधी असलेल्यांचा मृत्यू झाला असल्याचेही आरोग्यमंत्री म्हणाले. येत्या काळात सहव्याधी असलेल्यांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. केंद्राच्या सूचनेनुसार आपण काम करत आहोत. लोकांना पॅनिक होऊ देऊ नका. फक्त योग्य पद्धतीने काळजी घ्या. सहव्याधी असलेल्या रुग्णांची काळजी घ्यावी, अशा सूचना आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी केल्या आहेत. मे, जूनमध्ये मृतांची संख्या वाढली, मुंबई आघाडीवर कोरोना रुग्णांच्या या वाढीदरम्यान महाराष्ट्रात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये मे महिन्यात १२ आणि जूनमध्ये ५ मृत्यू झाले. मृतांपैकी १६ जणांना पूर्वीपासूनच आजार होते आणि एकाला दुसरा आजार होता. मुंबईत सर्वाधिक ४ मृत्यू झाले आहेत, त्यानंतर नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीत प्रत्येकी ३, नागपूर आणि कोल्हापूर प्रत्येकी २ आणि ठाणे, सातारा आणि सांगली येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारपर्यंत, महाराष्ट्रात ५२६ लोक सक्रियपणे संक्रमित आहेत, तर ५२१ रुग्ण बरे झाले आहेत. जानेवारीपासून राज्यात एकूण १३,७०७ कोविड-१९ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. देशभरात ४ हजार 302 सक्रिय रुग्ण देशभरातही कोरोनाच्या परिस्थितीतही वाढ झाली आहे. ४ जूनपर्यंत, भारतात ४ हजार ३०२ सक्रिय कोविड रुग्णांची नोंद झाली. २४ तासांत ८६४ रुग्णांची वाढ झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, यापैकी बहुतेक संसर्ग सौम्य आहेत आणि घरीच त्यांचे उपचार केले जात आहेत. या वर्षी १ जानेवारीपासून, राष्ट्रीय स्तरावर कोविडशी संबंधित ४४ मृत्यू नोंदवले गेले आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने सह-रोग असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. भारतात कोविडचा नवा व्हेरिएंट भारतात एक नवीन कोविड-१९ उपप्रकार, NB.1.8.1, आढळून आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) त्याच्या अद्याप अस्पष्ट साथीच्या प्रभावामुळे त्याला 'निरीक्षणाखालील प्रकार' म्हणून वर्गीकृत केले आहे.