News Image

आदित्य ठाकरे यांची देखील युती बाबत मनसेला साद:मनसे देखील त्यासाठी सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती; मात्र, सावध भूमिका


उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी एकत्र येणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. स्वतः उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह आता आदित्य ठाकरे यांनी देखील याबाबत मनसेला साद घातली आहे. त्यामुळे आता याबाबत मनसेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, मनसे अजूनही सावध भूमिकेत आहेत. याबाबत सावधतेने आणि हळूहळू पावले टाकण्याचे मनसेचे प्रयत्न दिसून येत आहे. त्यातच या युती बाबत मनसे देखील सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील युती बाबत आम्हाला देखील माध्यमांमधूनच कळत आहे. तसा युतीचा कोणताही प्रस्ताव शिवसेनेकडून आमच्याकडे आलेला नसल्याचे मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी म्हटले आहे. तसा प्रस्ताव आला तर त्यावर राज ठाकरे भूमिका घेतील. मात्र माध्यमातून असे प्रस्ताव येत नसतात. या आधी आमचे हात पोळलेले आहेत. त्यामुळे 'हात पोळल्यानंतर ताक सुद्धा फुंकुन' प्यावे असे म्हणतात. त्यातलाच हा एक भाग आहे. त्यामुळेच आम्ही सावध भूमिका घेत असल्याचे किल्लेदार यांनी स्पष्ट केले. आदित्य ठाकरे यांनीही घातली एकत्र येण्याची साद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या सूचक वक्तव्यानंतर उद्धव सेना व मनसेतील संभाव्य युतीच्या चर्चांनी आणखीनच जोर धरला आहे. खासदार संजय राऊतही दोन बंधू एकत्र येतील, असे संकेत देत आहेत. या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांचे पुत्र व युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही मनसेला सोबत येण्याची साद घातली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कोणत्याही पक्षाबरोबर एकत्र येण्यास तयार आहोत. म्हणूनच आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साद दिली असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले. महाराष्ट्राच्या हितासाठी म्हणजे काय? आदित्य ठाकरे म्हणाले की, मराठी माणूस व महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी आमच्याबरोबर यायला तयार असेल आम्ही त्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. काल परवा आमचे नेते दीपेश म्हात्रे व मनसेचे नेते राजू पाटील यांनी एकत्र येऊन आंदोलन केले. हे त्याचेच उदाहरण आहे. मात्र, महाराष्ट्राचे हित म्हणजे नेमके काय, हे आदित्य यांनी सांगितले नाही. दुसऱ्या फळीतील नेते उत्साही नाहीत यापूर्वी आमदार अनिल परब, अंबादास दानवे, सुनील प्रभू यांनीही युती बाबत अनुकूलता दर्शवली आहे. दुसरीकडे, मनसेच्या दुसऱ्या फळीतील काही नेते या युती बाबत फारसे उत्साही दिसत नाहीत. राज ठाकरे उद्धव सेनेत विलिन झाल्यास आपले काय, अशी चिंता त्यांना असल्याचे म्हटले जाते.