News Image

सोलापूरच्या संदीप डोंगरे यांना सत्यजित रे संस्थेची फेलोशीप:देशभरातून कठीण प्रक्रियेतून तिघांची निवड‎


सोलापूर सोलापूरच्या संदीप डोंगरे यांची कोलकाता येथील सत्यजित राय फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ( एसआरएफटीआय) रिसर्च फेलोशिप प्रोग्रामसाठी निवड झाली आहे. एसआरएफटीआय ही माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत एक नामांकित शैक्षणिक संस्था आहे. संपूर्ण भारतातून केवळ तीन संशोधकांची अत्यंत कठीण निवड प्रक्रिया व संशोधन प्रस्तावाच्या आधारे निवड करण्यात आली आहे.संदीप डोंगरे यांचे संशोधन हे सोलापूर एक बहुभाषिक शहर आणि इथे प्रदर्शित केले जाणारे चित्रपट, सिंगल स्क्रीन थेटर्स आणि प्रेक्षक अभ्यास याच्या वर आधारित असून, सोलापूर शहर हे चित्रपटाचा सांस्कृतिक वारसा म्हणून अभ्यासले जाणार आहे. ही फेलोशिप सहा महिन्यांची आहे. मार्च २०२४ मध्येही त्यांची एसआरएफटीआय कोलकाता आयोजित ‘आंतरराष्ट्रीय सिनेमा क्युरेशन कार्यशाळा’साठी देशभरातून निवड करण्यात आली होती. त्यांच्या अभ्यासाची मुख्य दिशा भारतीय चित्रपटाचा इतिहास, चित्रपट अभ्यास, सिने संस्कृती व वारसा आणि माध्यम अभ्यास या विषयांशी संबंधित आहे. सध्या संदीप डोंगरे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातुन पीएच.डी. करत आहेत. या आधी नुकताच त्यांनी अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठातून, मास्टर्स ऑफ व्हिज्युअल आर्ट्स अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. ही फेलोशिप त्यांच्या संशोधन प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असणार आहे.